
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाकडून जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयात कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला . महाविद्यालयाच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या महिलांचा गौरव व्हावा हा मानस बाळगून त्यांचा गौरव झाला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , प्रमुख पाहुणे मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , सत्कारमूर्ती प्रा.डॉ. ए.एन.गित्ते , प्रा.एन.टी.चवळे , श्रीमती वैशाली पाटील , उषा वारकड हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. एम.के.राऊत , सूत्रसंचालन प्रा.डॉ. विजय वारकड तर आभार प्रदर्शन ग्रंथालय सहाय्यक वैशाली पाटील यांनी केले .
प्रास्ताविकात डॉ. राऊत यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या संकल्पनेतून हा अभिनव कार्यक्रम मागील अनेक वर्षांपासून अखंड स्वरूपात चालू आहे . महिला ही सदैव सत्कारास पात्र आहे . त्यांचा त्याग , औदार्य , मेहनत घर , कुटुंब आणि समाज सांभाळून कार्य करत असतात असे विचार मांडले . प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात प्रा.साखरे यांनी प्राचीन काळापासून महिलांचा विकास , कौटुंबिक , सामाजिक योगदान , कर्तृत्ववान महिलांचा इतिहास , चूल आणि मूल सांभाळत काम करत असताना तारेवरची कसरत करावी लागते असे विचार व्यक्त केले . सत्कारमूर्तीपैकी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. गित्ते यांनी महिलांचा होणारा गौरव हा मातृशक्तिचा गौरव आहे . सत्काराबद्दल मनापासून आभार मानले . सत्कारामुळे नवीन भरारी घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे असे मनोगत व्यक्त केले .
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अडकिणे यांनी महिला ही केवळ घरच सांभाळत नाही तर देशाच्या विकासासाठी सदैव तत्पर असते . देशातील महिला ह्या देशाला उंचावर नेण्यासाठी मोलाची कामगिरी बजावत असतात . आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत . महाविद्यालयाच्या विकासात देखील अनेक महिला भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे असे विचार व्यक्त केले .यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .