
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवार, दि.९ रोजी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा जो अर्थसंकल्प मांडण्यात आला, तो महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा असून त्यात अनेक योजनांची घोषणा करण्यात आली.
शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून त्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेतील तिकीट दरात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचे अर्थमंत्र्यांने जाहीर केले आहे.
याआधी राज्यातील ज्यांचे वय ७५ वर्षावरील आहे, अशांना एस्.टी. मधील प्रवास मोफत करण्यात आला आहे. यानंतर आज महिलांसाठी ५० टक्के प्रवासाची सवलत देण्यात आल्याचे जाहीर केले आहे. अर्थात हा निर्णय अत्यंत मोठा असल्याचे मानले जात आहे. यामध्ये ‘लेक लाडकी’ ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली आहे. राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर रुपये ५००० एवढी रक्कम जमा केले जातील. त्यानंतर इयत्ता चौथीत असताना ४ हजार, सहावीत असताना ६ हजार आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८ हजार जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील असे अर्थमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेचे सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून मोठ्या प्रमाणात स्वागत केले.
* बचत गटातील ३७ लाख महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. * केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे मुंबईत युनिटी मॉलची स्थापना बचत गटासाठी करण्यात आली आहे. * आशा स्वयंसेविकांचे विद्यमान मानधन रुपये ३५०० आणि गटप्रवर्तकाचे सध्याचे मानधन ४ हजार ७०० रुपये आहे. यामध्ये रुपये १५०० एवढी वाढ केली जाणार आहे. * अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार ३२५ रुपयांवरुन रुपये १० हजार एवढे केले जाणार आहे. * मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ रुपयांवरुन ७ हजार २०० एवढे करण्यात आले आहे. * अंगणवाडी मदतनीसांचे मानधन रुपये ४ हजार ४२५ वरुन ५ हजार ५०० एवढे करण्यात आले असल्याची घोषणा झाली आहे. एकूणच शिंदे -फडणवीस सरकारची ही वाढीव घोषणा जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर महिलांसाठी लक्षणीय अशीच ठरली जाणे स्वाभाविक आहे.