
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक- मोहन आखाडे
छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने शहरात आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात यावे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर यालाच आता जलील यांनी देखील उत्तर दिले आहे. “आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असून, आमचे आंदोलन जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास, यापेक्षा मोठं आंदोलन उभे करण्यात येईल,” असा इशारा जलील यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषणास्थळी बोलताना जलील म्हणाले की, “फडणवीस म्हणाले की आंदोलन मागे घ्यावेत. पण त्यांना मी सांगतो आंदोलन मागे घेणार नाही. तुम्ही सांगितले म्हणून सर्व काही होणार नाही. तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही गृहमंत्री आहात. पण तुमच्यासारखे किती आलेत आणि गेलेत. तसेच आमचे आंदोलन जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षा मोठं आंदोलन उभे करण्यात येईल. सरकार आणि प्रशासनाला माझा हा इशारा आहे.”
पोलीस ठाण्यावर पाच हजार लोकांना घेऊन धडकणार!
तर पुढे बोलताना जलील म्हणाले की, “आम्ही कँडल मार्च काढल्याने माझ्यासह दीड हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. असे गुन्हे दाखल केल्याने आम्ही घाबरुन जाणार नाही. या गुन्ह्यात 29 लोकांची नावं असून, दीड हजार अज्ञात लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण कँडल मार्च काढणारे आम्ही अज्ञात नसून, आम्ही कोण आहोत, आमची ओळख सांगण्यासाठी आणि नावं देण्यासाठी शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात पाच हजार लोकांना घेऊन धडकणार आहोत.” तर पोलीस ठाण्याच्यासमोर रांगा लावून आम्ही आमची ओळख सांगणार असल्याचे देखील जलील म्हणाले आहेत.
हो आम्ही बिर्याणी खाल्ली…
तर पुढे बोलताना जलील म्हणाले की, “आमच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. विरोधकांकडून यासाठी विशेष प्रयत्न होत आहे. काय तर म्हणे आम्ही उपोषणाच्या ठिकाणी बिर्याणी का खाल्ली यावर चर्चा घडवली जात आहे. पण मी सांगतो आम्ही बिर्याणी खाल्ली आहे, तसेच उद्या नांद खलीया देखील खाणार आहे. त्यामुळे कोणीही कितीही प्रयत्न केले तर आम्हाला फरक पडणार नसून, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच ठेवणार आहे.”