दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी -शितल रमेश पंडोरे
————————————————–
संभाजीनगर -मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेला समृद्धी महामार्ग वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आधीच अपघातांच्या मालिकांमुळे चर्चेत आलेल्या समृद्धी महामार्गावर आता चोरांची दहशत पाहायला मिळत आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सोमवारी रात्री वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत एक महिला जखमी झाली आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चार चाकी वाहनातून (एमएच 33 वाय 9916) रितू राठी (वय 40 वर्षे, रा. नागपूर) शिर्डीहून नागपूरकडे प्रवास करत होत्या. दरम्यान त्यांची कार छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारातील समृद्धी महामार्गावर येताच धावत्या कारवर अचानक दगडफेक सुरु झाली. ज्यात रितू राठी जखमी झाल्या. दरम्यान त्यांच्या वाहनाच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशाल शेळके यांच्या वाहनावर देखील दगडफेक झाली. त्यामुळे त्यांनी वाहन थांबवून जखमी महिलेला मदत केली. तसेच याची तात्काळ स्थानिक पोलीसांना दूरध्वनीवरुन माहिती दिली. पण पोलिसांना येण्यासाठी उशीर होत असल्याने जखमी झालेल्या महिलेसह त्यांच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजीनगर शहर गाठून, पुढील उपचार केले.
