
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:शहरातील गोदावरी नदीच्या घाटावरील एका मंदिरावर शके १५१० चा उल्लेख असलेला दुर्मिळ शिलालेख परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा कमिटीचे सदस्य प्रा.डॉ.अविनाश खोकले यांच्या निदर्शनास आला होता. परत पाहणी करत असताना दुसरा एक शिलालेख शके १८७५चा उल्लेख असलेला बाजूच्या मंदिरावर आढळून आल्याचे इतिहास संशोधक डॉ. अविनाश खोकले यांनी सांगितले.
या दोन्हीही मोडी प्रभावित देवनागरी लिपीतील शिलालेखांचे वाचन डॉ.अविनाश खोकले यांनी पूर्ण केले आहे.
शिलालेख म्हणजे छनी आणि हातोडीच्या साह्याने दगडी शिळेवर कोरलेला लेख होय.जो दीर्घ काळ टिकतो.यावरून इतिहास काळातील राजकीय,सामाजिक,धार्मिक ,आर्थिक ,सांस्कृतिक आदि जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यास मदत होते. हा अभ्यास पुढील पिढीला आणि इतिहासाच्या वाचकांना, लेखकांना मार्गदर्शक ठरत असतो.
सखोल आणि चिकित्सक अभ्यासाअंती पहिल्या शिलालेखात असे वर्णन आलेले आहे की, हा शिलालेख, ( शके १५१० म्हणजे इ.स.१५८८ या वर्षाचा आहे. शक संवत सर्वधारी आहे, जेष्ठ मराठी महिन्यातील शुक्लपक्ष आहे. तिथी प्रतिपदा येते, ज्या तिथीला गुढीपाडवा येत असतो, पण ज्येष्ठ महिन्यात गुढीपाडवा असल्याचा उल्लेख मिळत नाही, पण पाडिवा तद्दिन अंतो हा संदर्भ यात प्रतिपदा हा दिवस दर्शवितो. योग धृती आहे, दिवस गुरुवार आणि इंग्रजी महिन्यातील तारीख 26 मे आहे, सूर्य नक्षत्र रोहिणी आहे, ऋतू ग्रीष्म व अयन उत्तरायण अशा या शुभप्रसंगी प्राचीन अशा गोदावरी तीर्थस्थळी कौशिक गोत्राच्या व श्रीवस्त गोत्राच्या ब्राह्मण मंडळींना दिवसाच्या सायंकाळी म्हणजे सूर्य अस्ताला जायच्या वेळेला दान दिल्याचा उल्लेख आढळतो.) पण हे दान कोणी दिले याचा मात्र उल्लेख दिसत नाही. यावेळी मराठवाड्यावर अहमदनगरच्या निजामशाहीचे राज्य होते. यावरून शिलालेख काही अंशी अपूर्ण असल्याचे दिसून येते. दुसऱ्या शिलालेखातील वर्णन ( निवृत्ती जयराम यानपल्लेवार, चैत्र शुद्ध , वार सोमवार, शके १८७५) अशा माहितीचा आहे शिलालेखातील चैत्र शुद्ध महिन्यात एकूण तीन सोमवार येतात. या तीनही वारांना अनुक्रमे गुढीपाडवा, रामनवमी,हनुमान जयंती असे सण उत्सव येतात. यापैकी 16 मार्च 1953, वार सोमवार, चैत्र शुद्ध, प्रतिपदा, गुढीपाडव्याच्या दिवशीचाच हा शिलालेख निश्चित असावा असे मत इतिहास संशोधक डॉ.अविनाश खोकले यांनी वाचनाअंती व्यक्त केले आहे. या शिलालेखांवरून तसेच सापडलेल्या प्राचीन अवशेषांवरून गोदा काठावरील आणि पात्रातील वास्तूंचा तसेच ऐतिहासिक मंदिरांचा काळ प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तिन्ही प्रकारात मोडणारा आहे.
अशी माहिती प्रा.डॉ.अविनाश खोकले यांनी दैनिक चालु वार्ता शी बोलताना दिली.
या शिलालेख व अवशेषांची पाहणी करत असताना इतिहास संशोधक डॉ.अविनाश खोकले यांच्यासह प्रा.कमलाकर चुडावेकर आणि रामप्रसाद ओझा हे उपस्थित होते.