दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
वाशिम : जिल्ह्यातील शेलुखडसे येथे ह.भ. प. दत्तात्रय घोळवे बाबा यांच्या प्रेरणा स्त्रोतातून सुरू झालेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा गेल्या ५२ वर्षांपासून अबाधितपणे सुरू असून, सालाबादप्रमाणे याही वर्षी गावकऱ्यांच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. काल दि. ६ एप्रिल रोजी सदर कार्यक्रमाची प्रेरणास्रोत घोळवे बाबा व आई यांच्या उपस्थितीत सांगता झाली. त्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत भजनी मंडळ, असंख्य पुरुष व महिला भक्तांनी केलेल्या हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमला होता, परिणामी शेलुखडसे नगरीत ” भक्तिमळा फुलल्याचे चित्र रसिकांना पहावयास मिळाले.

सदर अखंड हरिनाम सप्ताहाची दि. ३० मार्च रामनवमीला सुरुवात झाली होती सतत सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमात दररोज सकाळच्या सत्रात काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण दुपारी गाथा भजन व भागवत कथा सायंकाळी हरिपाठ आणि रात्री हरिकिर्तन व हरिजागराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ म्हणून बळीराम महाराज खडसे यांनी जबाबदारी पार पाडली तर, संदीप महाराज खडसे यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथा वाचन करण्यात आले. सप्ताहा दरम्यान सर्वश्री ह.भ. प. बाबुराव महाराज तडसे पुसद, नरेंद्र महाराज गुरव नाशिक, ज्योतीताई धनाडे जालना, काशिनाथ महाराज फुलकळसकर परभणी, चि. सोहम महाराज काकडे मेहकर, संगीता ताई व्यवहारे आळंदी देवाची, अनिल महाराज तुपे नाशिक आदी नामवंत किर्तनकारांच्या हरिकिर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ. प. भिकाजी महाराज कोकाटे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. भक्तिरसाच्या या कार्यक्रमात मनोहर महाराज अवचार, शेषराव महाराज खडकीकर, आणि विठ्ठल महाराज सुलदलीकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात भजन गायन करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. साथ संगत म्हणून श्री हरिबापू महाराज वारकरी शिक्षण संस्था बापूनगर कोठा येथील विद्यार्थी व माऊली भजनी मंडळ शेलुखडसे यांनी जबाबदारी पार पाडली.
सतत सात दिवस चाललेल्या या भक्तीमय कार्यक्रमासाठी भर जहाँगीर सर्कलचे जिल्हापरिषद सदस्य अमित बाबाराव पाटील ( खडसे ) यांनी विशेष सहकार्य केले, तद्वतच गावातील काही प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी किर्तनकार महाराज यांची विशेष सेवा केली. तर बऱ्याच अन्नदात्यांनी संपूर्ण सप्ताहात भजनी मंडळ, पहारेकरी, सेवाधारी, श्रोते व कार्यक्रमात नित्यनेमाने उपसस्थित असलेल्यांच्या फराळपाण्याची व भोजनाची व्यवस्था केली होती. संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने दि. ६ एप्रिल हनुमान जयंतीला महाप्रसादाचे आयोजन करून अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.
