
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर.
वाघोली (ता.12) नगर महामार्गावर वाहतूक दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. वळण असलेल्या ठिकाणी नागरिकांना जाण्यासाठी दुभाजकात छोटासा मार्ग ठेवला आहे. रस्ता ओलांडताना वेगाने येणारी वाहने दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे वाघोली येथे महत्त्वाच्या ठिकाणी स्कायवॉक करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
परिसरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या नागरीकरणामुळे शाळा, महाविद्यालये, दवाखान्यांची संख्या वाढू लागली आहे. नगर महामार्गाच्या दोन्ही बाजूला शाळा आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. अशावेळी लहान मुलांना रस्ता ओलांडताना धोका पत्करावा लागत आहे. भरधाव येणाऱ्या वाहनामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केसनंद फाटा, लोहगाव रोड, वाघेश्वर चौक, बकोरी फाटा, तुळापूर चौक आदी ठिकाणाहून वाहने रस्त्यामध्ये उभी केली जात आहे. तसेच, प्रवाशांची वाहतूक करणारी खाजगी वाहने अचानक रस्त्यात उभी केली जात आहेत. तुळापूर फाट्यावर हॉटेलसमोर उभ्या असलेल्या वाहनांनी बहुतांश रस्ता व्यापलेला असतो.
महामार्गावर असलेल्या दुकानासमोर देखील बेशिस्त दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. फडई चौकापासून ते केसनंद फाटा, वाघेश्वर बस थांबा ते भारत पेट्रोल पंप या दोन्हीही बाजूने बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. केसनंद फाट्यावर वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी होते.
यामुळे परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहे. नगर महामार्गावर सातव हायस्कूल, केसनंद फाटा, फडई चौक या ठिकाणी स्कायवॉक झाल्यास विद्यार्थी व नागरिकांना रस्ता ओलांडणे सोयीचे होईल. त्यामुळे या ठिकाणी स्कायवॉक उभारण्याची मागणी होत आहे.