दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- निधन,राजीनामा,अर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यांतील ७५ ग्रामपंचायतींमधील ११४ सदस्य व दोन थेट सरपंच पदांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे,अशी माहिती प्र.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
कार्यक्रमानुसार,मंगळवारी (१८ एप्रिल) तहसीलदार निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करतील.नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा कालावधी दि.२५ एप्रिलपासून ते दि.२ मेपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वा. असा आहे.त्यात दि.२९ एप्रिल, दि.३० एप्रिल व दि.१ मे रोजी सार्वजनिक सुट्ट्यांमुळे नामनिर्देशन दाखल करता येणार नाही.
नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ३ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून ती संपेपर्यंत करण्यात येईल.नामनिर्देशन दि.८ मे रोजी दुपारी ३ वा. पर्यंत मागे घेता येतील.निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी दि.८ रोजी दु.३ नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.या निवडणुकीचे मतदान दि.१८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी व निकाल दि.१९ मे रोजी जाहीर करण्यात येईल.निकालाची अधिसूचना दि. २५ मे रोजी प्रसिद्ध होईल.
