दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर आगाराचा कारभार संथ गतीने चालत असून या आगारात महामंडळाच्या बसगाड्या सोबतच ऑटोचा मुक्त संचार सुरू आहे. ऑटो चालकांचा धुडगूस दिसून येत व देगलूर मधील जुना बस स्थानकाच्या समोर अतिक्रमण खूप प्रमाणात वाढल्यामुळे बस चालकांना गाडी पास करण्यासाठी व प्रवाशांना ते जा करण्यासाठी नाकी नऊ येत असताना देखील आगार प्रमुख कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहर हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. देगलूर शहराचा महाराष्ट्र, कर्नाटक, आणि तेलंगणा राज्याशी संबंध येत असल्यामुळे या ठिकाणाहून तिन्ही राज्यात माल आणि प्रवासी वाहतूक होते. तिन्ही राज्यातील प्रवासी वाहने, माल वाहतूक करणारी वाहने, शिख यात्रेकरूंची वाहने व अन्य वाहनांची मोठी संख्या असल्यामुळे देगलूर- नांदेड रोडवर नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. देगलूर शहरात पूर्वी एकच बसस्थानक होते. वाढती प्रवासी संख्या आणि लोकवस्तीचा विचार करून देगलूर-नांदेड रोडवरील लेंडी नदीच्या अलीकडे नवीनबसस्थानकाची निर्मिती करण्यात आली. वाढत्या बेरोजगारीमुळे गेल्या कांही महिन्यापासून देगलूर शहरात ऑटोंची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रवासी घेण्यासाठी ऑटो चालक थेट बसस्थानकात येत आहेत.
