
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना पाेलिसांना आडकाठी आणणा-या निलंबित पोलिस कर्मचारी संजय कटकेसह चार ते पाच कार्यकर्त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यापुर्वी पोलिसांनी संजय कटके यांच्यासह काही जणांवर साैम्य लाठी चार्ज केल्याची घटना शहरातील अक्कलकोट लक्कडकोट परिसरात आज (साेमवार) घडली.
जालना शहरातील अक्कलकोट लक्कडकोट परिसरात श्रीजी ट्रेडर्स या मार्बल विक्रेता असलेल्या व्यापाऱ्याच्या जागेवर निलंबित पोलिस कर्मचारी संजय कटके व त्यांच्या पत्नी जयश्री कटके यांनी अवैधरित्या गुंडागर्दी करत ताबा मिळवत व्यापारी असलेल्या राठी यांना धमकावत या जागेवर आमच्या मालकीची असल्याचा दावा केला होता.
त्यानंतर व्यापारी राठी यांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय देताना जागेचे मुळ मालक राठी असल्याचा निर्णय दिला. तसेच ताबा व्यापाऱ्याला देण्याच्या सूचना पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिले. त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
त्यानुसार आज जागेचा ताबा व्यापाऱ्याला देण्यासाठी महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासन कारवाई करत असताना निलंबित पोलीस कर्मचारी संजय कटके हे पत्नी जयश्री कटके यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी प्रशासनास विरोध केला. दरम्यान पोलीस कर्मचारी आणि संजय कटके यांचा वाद झाला.
या वादातून पोलिसांनी लाठी चार्ज करत संजय कटके यांच्यासह चार ते पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेने लक्कडकोट परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी संबंधित जागेचा ताबा मिळवला असून व्यापाऱ्याला ताबा देण्याची प्रक्रिया पोलीस आणि महसूल प्रशासनाने सुरू केली आहे.