दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी:- शिवकुमार बिरादार
मुखेड :सध्याच्या युगात स्मार्टफोनच्या टच स्क्रीनचा वापर कमालीचा वाढला असून तरुणाईसह लहान बालके यात गुरफटून जात आहेत. मोबाईलसाठी जीवन की जीवनासाठी मोबाईल याचे भान राहिलेले नाही. घराघरात स्क्रीन टाईम वाढल्याने अनेक गंभीर दुष्परिणाम होत आहेत. मोबाईलच्या अतिवापराचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. यात मानसिक आरोग्य सह डोळ्यावर विपरित परिणाम होत असून अनेकांना चष्मा लागत आहे. मैदानी खेळ, व्यायाम बंद झाल्यान शारीरिक स्थूलता, चयपचायाच्या समस्या वाढत आहेत. त्याचे निराकरण करण्यासाठी पालकांनी घरात निर्बंध आणून समुपदेशनाद्वारे उपाय योजना करण्याची गरज आहे. आजकाल जिकडे पहावे तिकडे जो तो
व्यक्ती महिला, तरुण, युवती, बालके, जो-तो मोबाईल स्क्रीन रिल्स, व्हिडिओ गेम्स, चॅट पोस्ट्स पाहण्यात अन त्या बनविण्यात दंग झालेला दिसत आहे. या परिस्थितीत आनटी जीवन जगण्याच्या कलांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सर्वांनी मोबाईल कशापद्धतीने वापरायचा आणि कितीवेळ वापरायचा याचा गांभीर्यपूर्वक विचार करण्याची वेळ आली आहे.
प्रत्येकाच्या हातात टच स्क्रीन, वेगवान इनटरनेटसह स्मार्टफोन आला आहे. तरुणाई रिल्स बनसविण्यात, सेल्फी काढण्यात, व्हिडिओ गेम्सच्या विळख्यात अडकून पडली आहे. व्हॉटस् अॅप, इंस्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट अशा अनेक गुंतवून ठेवणाऱ्या अॅपमध्ये व्यस्त राहत आहेत. स्क्रीन टाईम वाढला असून बोटे खाली-वर फिरत आहेत. यात अनेक जण गुंग झाले आहेत. सोशल मीडियावर संवाद वाढला आहे. त्याचे परिणाम तरुणांवर होत आहेत. या तरुणाईला शारीरिक व मानसिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. स्मार्टफोन बालक, युवक, मुले, मुली, तरुणांचे मनोरंजनाचे साधन बनले आहे.
रात्रीचे जागरण वाढले
तरुण मुले, मुली पूर्वी अभ्यास करण्यासाठी रात्री जागरण करीत असत. सध्या विद्यार्थी नव्हे, तर नागरिकदेखील फेसबुक, व्हॉटस अॅप व रिल्स पाहण्यात दंग होऊन कामे बाजूला ठेवून कायम मोबाईल पाहण्यात गुंतलेले असतात. स्मार्टफोन वापरकर्त्यांना रिल्सने अक्षरशः भुरळ घातली आहे. त्यामुळे रात्रीचे जागरण वाढले आहे. सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसल्यानंतरही गप्पा मारण्याऐवजी तरुण मोबाईमध्ये डोके घालून बसत आहे. त्यामुळे त्याचा स्वभाव चिडचिडा होत आहे.
प्रत्येकाने स्क्रीन टाईम कमी करून मोबाईलचा वापर कमी करावा. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे घरातील लहान मुलांसमोर मोबाईल वापरणे किंवा रिल्स पाहणे बंद करावे. अंधारात अनेकजण मोबाईल पाहतात. यामुळे बालपणीच दृष्टी कमी होऊन डोळ्याचे आजार जडत आहेत.
डॉ. सुधाकर तहाडे
नेत्ररोगतज्ञ, उपजिल्हा रूग्णालय मुखेड.
