
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -अनिल पाटणकर
पुणे : सध्या मोबाईलच्या विळख्यात सापडलेल्या बालवयातील मुलांमध्ये विविध कलागुणांची जाणीव करून देऊन त्यांना त्याबाबत प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पुण्यातील अभिव्यक्ती, संघटीत महिला मंडळ, ताडीवाला रोड आणि जवाहर बाल मंच, पुणे यांच्यातर्फे वस्तीतील मुला-मुलींसाठी शनिवारी (६ मे ) एक दिवसीय उन्हाळी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन शनिवारी (६ मे ) रोजी सकाळी १० वाजता झाले शिबिरात वस्तीतील जवळपास ५० मुला-मुलींनी भाग घेतला होता. विज्ञान प्रयोग, ओरिगामी हस्तकला, सामूहिक शरीरशिल्प बनवणे यासह गाणी, विज्ञान कोडी आणि मजेदार खेळ अशा विवीध उपक्रमात मुलांनी सहभाग घेतला. मुलांनी नवनवीन गोष्टी करून पहाव्या, त्यांच्यामध्ये विज्ञान व विविध गोष्टींविषयी कुतूहल वाढावे, त्यांच्यातल्या गुणांना वाव मिळावा, त्यांना आनंद मिळावा आणि त्या अनुषंगाने चर्चा आणि गप्पांद्वारे मूल्यशिक्षण घडावे. हा उद्देश डोळ्यासामोर ठेवून हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं होते.
यावेळी संघटीत महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता शिंदे यांच्या घरी वस्तीतील मुलामुली आणि महिलांसाठी पुस्तक उपलब्ध झाली तर विविध विषयांची दालने त्यांच्यासाठी उघडतील हा हेतू डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालायचे उद्घाटन ताडीवाला रोड परिसरातील कॉंग्रेसचे नेते मेहबूब नदाफ यांच्या हस्ते झाले. यावेळी वस्तीतील मुले, महिला, संघटीत महिला मंडळाच्या सुनिता शिंदे, कविता मेटकरी, स्नेहल मोहिते तर अभिव्यक्तीच्या श्रद्धा रेखा राजेंद्र, गीतांजली अंजली प्रकाश, अजित पेंटर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिरासाठी विश्वदीप तरुण मंडळाचे विशेष साहाय्य लाभले.