
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी- बालाजी देशमुख
बीड/परळी- -परळी विधानसभा मतदारसंघात घाटनांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते मराठवाडा किसान संघाचे अध्यक्ष व काँग्रेसचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अॅड. माधव जाधव हे सक्रिय झाले आहेत. परळीत त्यांनी संपर्क कार्यलय सुरू केले आहे. आपत्कालीन परिस्थिती ओढवलेल्यांना फूल ना फुलाची पाकळी स्वरूपात मदत करणे सुरु केले आहे. माधव जाधव मित्रमंडळ नावाने पंधरा दिवसांपूर्वी परळीत कार्यालयदेखील सुरु केले. कार्यालयाच्या या उद्घाटनावेळी माजी खासदार तथा स्वराज्य पार्टीचे प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते. या कार्यक्रमात परळीतील गोंधळलेली स्थिती तसेच शहरात वाढत्या सावकारीचा मुद्दा अॅड. माधव जाधव यांनी उपस्थित केला होता. नागरिक, व्यापारी, शेतकऱ्यांचे प्रश्नही त्यांनी मांडले. माधव जाधव जनतेच्या मनातील प्रश्न घेऊन पुढे येत असून त्यांना परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवायची आहे, तसे त्यांनी आपणच पर्याय असल्याचे घोषित केले आहे. महाविकास आघाडीत परळीची जागा कोणाकडे जाईल? हा पेच आहेच, त्याचबरोबर राज्य आणि राष्ट्रीय नेते असलेल्या परळीच्या बहीण-भावाच्या बलाढ्य लढाईत अॅड. माधव जाधव यांचा टिकाव लागेल का? अशी कुजबुज ऐकावयास मिळत आहे.