
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर : देगलूर शहर व तालुक्यामध्ये गुटखा सहज उपलब्ध हवे त्या प्रमाणात मिळत आहे .इतर प्रांतातून आयात करून हा गुटका बागन टाकळी येथे साठविण्यात येते व येथूनच संपूर्ण शहर व तालुक्यामध्ये विक्री करण्यात येते .येथील गुटका माफियाने आता आपले पाय बिलोली , मुखेड,नांदेड जिल्ह्यातही पसरले असल्याचे दिसून येत आहे .
दरम्यान या गुटखा माफियावर देगलूर येथील पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद असून या गुटखा माफियाची कोणीही काही वाकडे करू शकत नाही असा अविर्भाव गुटखा माफिया दाखवीत असल्याने त्याच्या मुजोरीपणास पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचे दिसते .गेल्या काही दिवसापूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याने अशा अवैध धंद्यावर आळा घालावा यासाठी निवेदन दिले असताना येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्या निवेदनदात्यासच धमकी दिली असल्याने अशा अवैध धंदे चालकांना आता नवउर्जा मिळाली आहे .
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखाबंदी आहे याचाच फायदा घेत काही गुटखा माफियांनी व अवैध धंदे चालकांनी इतर प्रांतातून गुटखा आयात करून छुप्या मार्गाने विक्री करीत आहेत .
देगलूर शहरात तर गुटखा हा केव्हाही आणि कधीही आणि कुठेही मिळत आहे .देगलूर शहर, तालुका व देगलूरच्या शेजारील इतर तालुक्यातही गुटखा अत्यंत सहजपणे मिळत असतो हा गुटखा बागन टाकळी येथील गुटखा माफिया बाबू मिया यांच्या देखरेखी खाली चालत असतो .
अगदी सहज गुटका मिळत असल्याने देगलूर शहरातील शाळकरी मुले , युवक व महाविद्यालयीन विद्यार्थी या गुटख्याच्या आहारी जाऊन आपले आरोग्य खराब करून घेत आहेत . या गुटख्याच्या पाऊच वर स्पष्टपणे कर्करोगास आमंत्रण असे लिहिले असताना सुद्धा येथील तांबूल शौकीन या गुटक्याचे सेवन करीत आहेत . अनेक कार्यालयीन कर्मचारी सुद्धा या गुटख्याच्या आहारी आहेत . शहरातील कोणे कोपरे हे थुंकीने भरून गेलेले आहेत .हा सर्व प्रकार पोलीस प्रशासना स्पष्टपणे दिसत असला तरीही या गुटखा माफियावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही करीत नसल्याचे दिसून येते . शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात , ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यापाड्यात टपरीवर हा गुटखा अगदी सहज मिळत असल्याने गुटखाबंदी खरच बंदआहे की नाही असा संभ्रम जनतेत निर्माण झाले आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर या विषयात लक्ष घालून नवतरुणाचे स्वास्थ्य कसे चांगले राहिल याकडे लक्ष दिले पाहिजे अशा या गुटखा माफियावर लवकरात लवकर कारवाई करावी असे जनतेतून मत व्यक्त होत आहे.