
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: पुन्हा एकदा देगलूर पोलिसांची कार्य तत्परता दिसून आली देगलूर शहरातील देगाव नाका परिसरातून मागील दोन दिवसांपूर्वी दोन वयोवृद्ध महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या अंगावर दागदागिने असल्याने घातपात तर झाला नाही ना? असा संशय व्यक्त केला जात असतानाच देगलूर पोलिसांनी यशस्वी कामगिरी करत त्या दोन महिलांचा शोध लावत सुखरूपपणे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
सायबाबाई इरण्णा कुरमुलवार (वय ७५) व नागाबाई सायलू कडलवार (वय ७०) या दोघीही देगलूर येथील गोकुळनगरातील रहिवासी असून, ३० मे रोजी शहरातील देगाव रोड परिसरातून सकाळी ११ वाजताच्या दरम्यान बेपत्ता झाल्या होत्या. या प्रकरणी देगलूर पोलिस स्टेशन येथे नोंद झाली होती. पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे व चंद्रसेन देशमुख तसेच देगलूरचे पोलिस निरीक्षक सोहन माछरेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवी मुंडे, हेड कॉन्स्टेबल कणकवले, सुनील पत्रे, पुठ्ठेवाड या पथकाने तपास केला.
मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे या महिला बार्शी जि. सोलापूर येथेअसल्याचे कळताच तत्काळ पथक रवाना करून १ जून रोजी सुखरूपपणे त्यांना नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे या महिलांच्या नातेवाइकांनी व देगलूर शहरातील नागरिकांनीदे देगलूर पोलिसांवर अभिनंदनचा वर्षाव केला.