
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आजचा पालक हा अत्यंत जागरूक पालक आहे. याचे कारण म्हणजे लहान कुटुंब, एक किंवा दोन मुले, आर्थिक सुबत्ता, उंचावलेले राहणीमान, प्रसार माध्यमे व सोशल मिडियामुळे जगाची झालेली ओळख . याची परिणिती म्हणजे तो आपल्या पाल्याला आवश्यक त्या सर्व चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जीवाचा आटापीटा करताना दिसतो .
प्रचंड स्पर्धेच्या या युगात आपला पाल्य ज्ञानात्मकच नव्हे तर गुणात्मक व व्यक्तीमत्वाच्या हष्टीकोनातूनही ठसठसीत उठून दिसावा यासाठी तो प्रयत्नशिल आहे. यासाठी तो पाल्याला सर्वोत्तम शाळा किंवा कॉलेज, सर्वोत्तम शिकवणी, संगणक, इंटरनेट यासारखी अत्याधुनिक साधने, वाहनाची सुविधा उपलब्ध करून देतो. ही साधने उपलब्ध करून देण्यासाठी कुवत असताना किंवा कित्येकदा कुवतीच्या बाहेर जाऊनही धडपड करताना दिसतो. यात त्याची किती दमछाक होते हे त्याच्या जीवालाच कळते. कित्येकदा स्वतःची सुख स्वप्न, आशा आकांक्षाना बाजुला ठेऊन तो आपल्या पाल्यासाठी कष्ट घेताना दिसतो. यात त्याला एवढेच अपेक्षीत असते की मी कुठे कमी पडता कामा नये ज्यामूळे मुलाच्या घडवणूकीत अडथळा निर्माण होणार नाही. आपला मुलगा किंवा मुलगी चांगल्या पद्धतीने शिकून त्याने नाव कमवावे, चांगल्या पदावर जावे एवढेच नाही तर एक चांगला नागरीक बनावे असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते.
केवळ शिक्षणासाठी खेड्यातून तालुक्याला जाणारे तालुक्याहून जिल्ह्याला जाणारे व जिल्ह्याहून ही आणखी मोठ्या शहरात जाणारे असंख्य पालक आहेत. स्वतः पन्नास ते शंभर किमी जाऊन येऊन करणारे किंवा ज्यांना शक्य नाही ते मुलांना किंवा मुलींना खोली करून किंवा हॉस्टेलला ठेवतात. मुलाच्या भवितव्यासाठी पाण्यासारखा पैसा
ओतणारे असंख्य पालक आहेत स्वप्न एकच पाल्य चांगला बनला पाहिजे !पालकांच्या या धडपडीला सलाम !!
साधारण पहिली ते बारावी यातील प्रत्येक टप्प्यावर पालक आपापल्या परीने प्रयत्न करतच असतो. या प्रचंड धावपळीत पालक चिंतेचे एक ओझे सतत डोक्यावर घेऊन बाळगत असतो ते म्हणजे माझ्या कष्टाला फळ मिळेल की नाही ? या चिंतेमुळे स्वतः पालक त्याचा पाल्य व एकूण कुटुंबच सतत अनिश्चिततेच्या सावटाखाली असलेले दिसतात.
पुष्कळवेळा असे होते की एवढे सगळे करूनही विद्यार्थी अपयशी ठरतात. मग मात्र त्या कुटुंबाची अवस्था फारच भयानक होते. आई वडीलांची निराशा, विद्यार्थ्याचे दुःख त्यातून येणारे नैराश्य बरेचदा आत्महत्या असे एक दुष्टचक्रच चालु होते. पालक स्वतःच्या नशीबाला दोष देतात, इतके दिवस मुलगा चांगला आहे मेहनत करतोय असे म्हणणारे पालक आता पाल्याला दोष द्यायला लागतात. आपण कुठे कमी पडलो हे मात्र त्या विद्यार्थ्याला कळतच नाही. त्यांचा वैचारिक गोंधळ उडतो . अस का घडल याची योग्य चिकित्सा केली जात नाही. जे व्हायच ते झाले आता उकंडा ऊकरून काय फायदा ? असे म्हणून हा विषय तिथेच संपवला जातो. पुढे एखाद्या कोर्सला प्रवेश देऊन त्या कुटुंबापुरता हा विषय संपतो. दुसऱ्या कुटुंबामध्ये ही हाच प्रकार पून्हा सुरु असलेला दिसतो. काही पालक आपल्या पाल्याची कुवतच कमी आहे असे म्हणून समाधान करून घेतात पण या निष्कर्षाप्रत येण्यासाठी त्यांची व मुलाची 12 वर्षे व भरपूर पैसा त्यांनी मोजलेला असतो. मनात खंत मात्र कायम!
वेगवेगळ्या स्तरातील यात पालकांचा आर्थिक स्तर पाल्याचा वेगवेगळा शै. स्तर, शहरी गामीण अशा पालकांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली तेंव्हा काही बाबी निदर्शनास आल्या त्या अशा
(हे लेखकाचे वैयक्तीक निरीक्षण व निष्कर्ष आहेत वाचक सहमत असतीलच असे नाही )
1) बहुतांश पालक इयत्ता पहिली ते12 वी पर्यंत आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करण्यास तयार आहेत.
2 ) बहुतांश पालक आपल्या मुलाच्या शै. प्रगतीसाठी डोळेझाकून 100% शिकवणी किंवा शाळा कॉलेजवर अवलंबून आहेत. याचे कारण म्हणजे एक तर आम्हाला वेळ नाही किंवा आम्हाला यातले काही कळत नाही असे म्हणणारे बरेच पालक आहेत.
3 ) काही थोडेच पालक विद्यार्थ्याला स्वतः घेऊन बसतात तेही ठराविक वर्गापर्यंत किंवा ठराविक विषयापुरतेच .
4 ) काही पालक पाल्याप्रमाणे स्वतःचे रुटीन बनवतात उदाः सकाळी त्याच्यासोबत उठणे तो अभ्यास करताना स्वतः आपण काही वाचन किंवा व्यायाम करणे त्यांच्या बरोबर ट्यूशनला सोडवायला जाणे घेऊन येणे, सोबत जेवण, त्याच्या सोबत जेवण व झोप इ.
5 ) फारच कमी पालक असेही होेते की त्याचे त्याने पहावे जसे करील तसे भरील मी काही चिंता करत नसतो.
10वी 12वी च्या निकालानंतर गेली 12 वर्षे प्रत्येक वेळी अनेक पालकांशी चर्चा केली असता असे लक्षात आले की बहुतांश पालक हे वरीलपैकी एका गटातील होते . यथाशक्ती सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या परंतू अनेक पालकांचा एकच सुर होता की आमचे पाल्य अपेक्षीत यश गाठू शकले नाही. यातील बहुतांश पालकाचे असे म्हणणे होते निदान त्याने N EET – JEE मध्ये आवश्यक तेवढे गुण घेतले नाहीत हे मान्य पण तो त्या गुणांच्या आसपास तरी असावयास पाहिजे होता.
JEE 360 गुणांची व NEET 720 गुणांची आहे. यात JEE साठी 80 पेक्षा जास्त व NEET मध्ये 450 पेक्षा जास्त गुण मिळवले तरी तो ठिक आहे असे समजले जाते पण विद्यार्थी JEEमध्ये 10 ते 40 व NEET मध्ये 130 ते 230 गुण घेतात थोडक्यात काय तर पालकांचा अपेक्षाभंग होतो.
इयत्ता 8 वी ते 12वी च्या विद्यार्थ्यासोबत चर्चा केली असता काही बाबी निदर्शनास आल्या त्या अशा
1 ) बहुतांश विद्यार्थ्यांचे असे म्हणणे होते की शिक्षक शिकवताना समजल्या सारखे वाटते परंतू घरी आल्यावर जेंव्हा तोच घटक आम्ही वाचतो तेव्हा काहीच समजत नाही .
2) काही संकल्पना निट समजत नाहीत किंवा त्यांना या आधी त्या माहित नाहीत त्यामूळे विषय समजायला अवघड जातो .
3 ) शाळेतील शिक्षक पाठ्यपुस्तकातून शिकवायचे आता 11 वी12 वी चे ट्यूशनचे शिक्षक काय शिकवतात कोणत्या पुस्तकातून शिकवतात व शिकवलेले नंतर कोणत्या पुस्तकातून वाचायचे तेच कळत नाही त्यामूळे गोंधळ उडतो
4 ) पालक व शिक्षकांचा सतत पाठ करा, वाचन करा असा भडीमार असतो पाठ केले तरी लक्षात बसत नाही.
5) पुष्कळदा हे आपणाला झेपणार नाही अस वाटत पण हे सांगायचे कोणाला व कसे हे कळतच नाही.
त्यामूळे गुणपत्रिका हातात येईपर्यंत सर्व काही अलबेल आहे असेच दाखवावे लागते व शेवटी अपेक्षाभंगाचे दुःख पदरी पडते.
वरील सर्व बाबींचा विचार करता या निष्कर्षाप्रत येता येते की,
1 ) बहुतांश विघार्थ्यांची आवड एका विषयात पण निवड दुसऱ्याच विषयाची होते. पाल्य स्पष्टपणे आपल मत मांडू शकत नाहीत.
2 ) बहुतांश विद्यार्थ्यांची कुवत कमी असते पण स्पर्धेच्या रेट्यामूळे अनेक अपेक्षा त्याच्यावर लादल्या जातात. परिणामी अपयश पदरी पडते. खरे तर हा विषय खूप खोल आहे. तरी थोडक्यात यावर उपाय काय तर
1 )पालकांना आपल्या पाल्याची कुवत लक्षात येते अवास्तव कल्पना न करता कोणत्याही सबबीचा आधार न घेता स्वतः तटस्थपणे व वस्तुनिष्ठ मूल्यमापन करावे
2 ) खोट्या सामाजीक दबावाला बळी न पडता पाल्याच्या भवितव्या विषयी निर्णय घ्यावा.
3 ) पाल्याशी संबंध असे असावेत की तो 100% चुकीचे बोलला किंवा वागला तरी त्याचे प्रथमदर्शनी सहजपणे ऐकूण घेतले जाईल अन्यथा पाल्य तुम्हाला त्याच्या मनातले बोलणारच नाही तो खोटे बोलेल किंवा तुमच्या मनासारखे ओळखून बोलेल .
4 ) डॉक्टर इंजी. नाही झाला तर दुसरी कडे कोर्सला असे कधीही करू नका त्याच्या आवडी निवडीशी संबंधीत भरपूर क्षेत्र व कोर्स उपलब्ध आहेत याची जाणीव ठेवा
5 ) मुलाशी आत्मीयतेने संवाद साधा त्याच्या मनातले तो नक्की सांगेल. त्याच्याशी चर्चा करा मगच निर्णय घ्या निर्णय लादु नका .
6 ) पालकच त्याचे सर्वात जवळचे विश्वासू मित्र व सल्लागार आहेत असे त्याला वाटले पाहिजे चुकूनही वेगळे वर्तन करू नका
7 ) कोणाशी तुलना करू नका किंवा इतरावरून त्याला हिणवू नका
8 ) पाल्य जर स्वतःच्या अपयशाचे चुकीच्या पद्धतीने समर्थन करत असेल तर चुकूनही त्याला साथ देऊ नका अपयश हे कधीही कायमचे नसते हे त्याला समजावून सांगा
9 ) त्याच्या प्रत्येक अपयशात खंबीरपणे त्याच्या मागे उभे रहा त्याला धीर द्या कुठे चुक झाली यावर शांतपणे त्याच्याशीच चर्चा करा
10 ) लक्षात ठेवा त्याचे प्रत्येक यश अपयश हे काही प्रमाणात दोघांचेही आहे. म्हणून तो तुमचाच एक भाग आहे हे नेहमी लक्षात असु द्या
म्हणून पालकांनो वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच सावध व्हा व आपला वेळ, पैसा व मनस्ताप वाचवा
प्रा. विजयकुमार प्र. दिग्रसकर