
नवी दिल्ली : पाणबुडी गायब झाल्यानंतर पाच दिवसांनी या सर्वांना मृत घोषित करण्यात आलं आहे. या सर्वांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत आता माहिती समोर आली आहे.काही दिवसांपासून टायटन ही पाणबुडी चर्चेत आहे. टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी या पाणबुडीतून पाच अब्जाधीश समुद्राखाली गेले होते. मात्र, त्याच्या या प्रवासाचा शेवट अत्यंत दुःखद झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या पाणबुडीच्या आतमध्ये स्फोट झाल्यामुळे ही फुटली. ज्यामुळे आतील सर्वांचा मृत्यू झाला. समुद्राच्या पाण्याच्या दबावामुळे या पाणबुडीचं इम्प्लोजन झालं असावं असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.साधारणपणे आपण जो स्फोट पाहतो, तो एक्स्प्लोजन असतो. म्हणजे यात एखादी वस्तू आतून बाहेरच्या दिशेने फुटते. याच्याच अगदी उलट प्रक्रिया म्हणजे इम्प्लोजन. पाण्याखाली असलेल्या या पाणबुडीमध्ये असलेल्या यांत्रिक तुटीमुळे समुद्राच्या पाण्याचा संपूर्ण दबाव या पाणबुडीवर पडला. त्यामुळे ही आतल्या दिशेने फुटली.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्राच्या आतमध्ये असलेला दबाव हा पृथ्वीवरील हवेच्या तुलनेत ३५० पटींनी अधिक असतो. म्हणजेच सुमारे चार ते पाच हजार पौंड प्रति वर्ग इंच एवढा हा दबाव असू शकतो. अशा वेळी पाणबुडीमध्ये छोटासा लीक असला, तरीही त्यामुळे इम्प्लोजन होऊ शकतं. हा विस्फोट काही मिली सेकंदांमध्ये होतो, त्यामुळे यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आजिबात वेळ मिळत नाही. विस्फोटाची तीव्रता पाहता, पाचही अब्जाधीशांचे मृतदेह मिळणे अशक्य असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. यूएस कोस्ट गार्ड्स तरीही पाणबुडीचे अवशेष शोधण्यासाठी मोहीम सुरू ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
१६ जून रोजी न्यूफाउंडलँड या ठिकाणाहून या सर्वांनी आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती. ते एका जहाजाने अटलांटिक महासागरात पोहोचले. त्यानंतर १८ जून रोजी हे सर्व अब्जाधीश सबमर्सिबलमधून पाण्याखाली उतरले. सकाळी ९ वाजता पाण्याखाली गेल्यानंतर ११.४७ च्या सुमारास त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला.
सायंकाळी ६.१० पर्यंत हे सर्व वरती येणार होते. मात्र, तसं झालं नाही. यानंतर ६.३५ वाजेपासून शोधकार्य सुरू करण्यात आलं. यांना शोधण्यासाठी अमेरिका आणि कॅनडाची नौदलं, आणि काही खासगी समुद्र पर्यटन कंपन्या प्रयत्न करत होत्या. मात्र गुरुवारी रात्री अधिकाऱ्यांनी या सर्वांना मृत घोषित केलं…