
शासन देईल का नगरवासीयांना उभारी !!
दै.चालु वार्ता नांदेड शहर विशेष प्रतिनिधी
प्रा.विजयकुमार दिग्रसकर.
प्रत्येक कामासाठी शासनावर अवलंबून न राहता जनतेचेही काही कर्तव्य आहे या उदात्त भावनेतून नांदेड उत्तर मतदार संघातील कॅनॉल रोडवर असलेल्या लोकमित्र नगरातील नागरीकांनी लोकवर्गणी गोळा करून सुमारे 35 लाखाची मलनिःसारणाची व्यवस्था केली. लोकमित्र नगर हा भाग ग्रामपंचायत पावडेवाडी (बु) च्या अधिपत्याखाली येतो. नांदेड महानगरपालीकेला खेटून असलेला हा भरवस्तीचा भाग काही तांत्रीक बाबीमुळे विकासापासून दुरच राहिला आहे. मुलभूत सुविधांतर्गत रस्ते . पाणी, विज, ड्रेनेज लाईन इ. ची आवश्यकता असते. नागरी आरोग्या साठी अत्यंत आवश्यक अशी बाब म्हणजे मलनिःसारण साठी ड्रेनेज लाईन . पण ग्रामपंचायतींना मोठ्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसतो त्यामूळे ग्रामपंचायत इच्छा असूनही हा निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही ही बाब लक्षात घेता लोकमित्रनगर फेज 2 मधील सर्व कुटुंबानी एकत्र येऊन ही समस्या मिटवण्याचे ठरवले व प्रतीकुटुंब 20 ते 25हजार वर्गणी जमा करून सुमारे 35 लाख रुपयांची ड्रेनेज लाईन टाकून घेतली. या कामात रस्ते खोदकाम झाल्यामूळे रस्ता खराब झाला आहे. पावसाळा जवळ आल्यामूळे चिखलाची समस्या निर्माण झाली आहे. नागरीकांना घराबाहेर पडणे सुद्धा मुश्किल होणार आहे. लोकमित्रनगर पाण्याची टाकी ते शिवरोड असा रस्ता मंजुर झाल्याचे कानावर येते पण प्रत्यक्षात काम केंव्हा चालु होणार व पावसाळा सुरु होण्यापूर्वी नागरीकांना रस्ता मिळेल की नाही ही भिती नागरिकांना भेडसावत आहे. नगराची आधीचीच स्थिती चांगली होती पैसे देऊन आपण हे विकतचे दुखणे तर आणले नाही ना अशी भावना नगरवासीयांची बनत आहे. खरे तर या100 % लोकसहभागातून केलेल्या कौतुकास्पद कामगीरीला शासन तात्काळ रस्ता करून उभारी देईल का हाच प्रश्न आहे अन्यथा कोणीही अशी कामे करायला धजावणार नाही.