
दै.चालु वार्ता
उपसंपादक पुणे जिल्हा शाम पुणेकर.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड मधील मोशी येथे महापालिकेच्या वतीने भव्य क्रिकेट स्टेडियम प्रस्तावित आहे. हे स्टेडियम शहराची शान वाढविणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून येथे सर्व परदेशी संघ येवून आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. स्टेडियम साठी सुमारे ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच हे स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. सल्लागाराने डिझाईन, खर्चाचे अंदाजपत्रक व इतर शासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर रक्कम अंतीम होईल. मोशीतील प्रभाग तीन मधील आरक्षण क्र. १/२०४ येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणे, यासाठी सन २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ४०० कोटी रूपयांची मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच स्टेडियमचे संपूर्ण काम दिलेल्या निर्धारित वेळेत द्रुतगतीने पूर्ण करून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री किंवा एका गाजलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या हस्ते स्टडियमचा उद्घाटन सोहळा संपन्न व्हावा असा महानगरपालिकेचा मानस आहे.