
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
मागील दहा वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या विश्वकर्मा सेवा संघ नांदेड च्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व उपवर-उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन ०९ जुलै २०२३ रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील विश्वकर्मा समाजातील सन २०२३ मध्ये इयत्ता १० वी ७५% पेक्षा अधिक, इयत्ता १२ वी ७०% पेक्षा अधिक गुणवत्ता धारक, UPSC, MPSC निवड झालेले, MBBS, Engineering प्रवेशपात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी जपत वधु – वर पित्यांच्या सोयीसाठी उपवर-उपवधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण गंगाधरराव उप्पलवार माजी नगरसेवक न.पा.बिलोली, प्रमुख अतिथी डॉ. श्रीकांत पाटील अध्यक्ष क्रिप्स भोपाळ, डॉ. कृष्णनाथ पांचाळ (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, श्री मारोतराव कवळे गुरुजी अध्यक्ष व्ही.पी.के उद्योग समुह उमरी, डॉ. नागेश्वर पांचाळ, छत्रपती संभाजीनगर हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विश्वकर्मा समाजासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या ४ व्यक्तींचा यात ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
यात शिक्षण विस्तार अधिकारी तथा साहित्यिक व्यंकटेश चौधरी, योगाचार्य नागोराव पोलादवार नांदेड, माजी सरपंच शिवाजीराव पांचाळ भोकर, हभप मधूकर महाराज शेंबोलीकर यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त एपीआय रमाकांत पांचाळ व विविध अत्याधुनिक शेतकी अवजारे बनवणारे मधुकर पांचाळ शेलगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
आपल्या कौटुंबिक हालाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आपल्या पाल्यांना शिक्षण देऊन उच्च पदावर पाठवणाऱ्या २ महिलांना ‘हिरकणी’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
या विश्वकर्मा पांचाळ समाजाच्या गुणगौरव सोहळ्यासाठी सर्व विश्वकर्मीय समाजबांधव व भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.