
©® सुवर्णा बाबुराव कळसे
भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असतांना मराठवाड्यातील गोरगरिबांना, सुग्यामुग्यांना शिक्षण मिळणं दुरापास्त होतं. गावोगावी शाळा नसल्यामुळे खेड्यापाड्यातील मुलं शिक्षणापासून लांब होती. परगावात जाऊन शिक्षण घेणे, तिथे राहणे अनेकांना शक्य नव्हते. त्यामुळेच खेड्यापाड्यातील मुलं शिक्षणापासून वंचित होती. अनेक गोरगरीब, बहुजनांच्या मुलांना तर शिक्षण मिळणे अशक्य होते. अशा काळात म्हणजेच १९४८ साली लोहा, कंधार, नांदेड सारख्या भागातील गोरगरीब, वंचित, बहुजन सुग्यामुग्यांना, खेड्यापाड्यात, वाडी-तांड्यांपर्यंत ” शिक्षणाची गंगा ” नेऊन ज्ञानामृत पाजण्याचे अतिशय खडतर कार्य कष्टाने, तळमळीने, निष्ठेने, भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेबांनी केले. त्यामुळेच त्यांना
” शिक्षण भगीरथ ” म्हणणे यथार्थ ठरेल.
शंकरराव धोंडगे पाटील आणि मुक्ताई या दांपत्याच्या पोटी 1922 सालच्या जुलै महिन्यात भाई डॉ.केशवरावांचा जन्म झाला. बालपणीच त्यांच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र हरपले. माय मुक्ताईने, आई आणि वडील अशी दुहेरी भूमिका बजावून बाळ केशवाचे संगोपन केले. त्यांना लहानाचे मोठे केले. नुसतेच मोठे केले नाही, तर संस्कारक्षम, सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवले. केशवरावांचे प्राथमिक शिक्षण अंबुलगा येथे झाले. पुढे कंधार येथेही त्यांचे काही शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना अंबाजोगाईला जावे लागले. पण एका वर्षातच नांदेड येथे यावे लागले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद), अमरावती अशा विविध ठिकाणी शिक्षणासाठी त्यांना जावे लागले. शिक्षणासाठी झालेली ही वणवण पाहून, माय मुक्ताई तळमळीने म्हणाल्या,” बाळ केशवा, शिक्षण घेण्यासाठी तुला जो त्रास झाला, तो इतरांना होऊ नये. गोरगरिबांना तर शिक्षण मिळतही नाही. त्यामुळे तू शाळा काढ.” मातृभक्त असलेल्या केशवरावांना आईच्या या वाक्याने प्रेरणा मिळाली. माय मुक्ताईच्या या उदात्त स्वप्नाचा भाई डॉ. केशवरावांनी ध्यास घेतला. 9 मे 1922 रोजी गऊळ या गावी ” श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची ” त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. या शिक्षण संस्थेतील “मोफत” हा शब्द लक्ष वेधून घेतो. परंतु त्यांचा शाळा काढण्याचा मूळ उद्देशच गरिबांना, बहुजनांना शिक्षण मिळवून देणे हा होता. जगण्याचा संघर्ष करावा लागणाऱ्या समाजाला, समूहाला शिक्षणासाठी पैसा खर्च करणे, शक्य नव्हते. केवळ पैशा अभावी कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये, ही तळमळ धोंडगे साहेबांची होती. अनेक गावात अनेक शाळा, महाविद्यालये त्यांनी सुरू केले. कंधार शहरात विधी महाविद्यालय ही काढले संस्थेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. नांदेड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) सारख्या शहरातील गोरगरीब, कामगार, कष्टकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी या शहरी भागातही त्यांनी शाळा सुरू केल्या. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून पुढची पिढी सशक्त बनवण्यासाठी ज्योतिबा फुले यांच्या मार्गाने भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब झटत होते. त्यांच्या शिक्षण संस्थेत पैसा नसलेल्या वर्गातले विद्यार्थी घडले, अजूनही अविरतपणे हा ज्ञानयज्ञ श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सुरू आहे. या शिक्षण वाटेवरच्या प्रवासात भाई गुरूनाथरावजी कुरुडे यांची सदैव साथ भाई डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब यांना लाभली.
मुळातच नेतृत्व गुण असलेल्या दिवंगत भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी तत्कालीन निजामी राजवटी विरोधात आंदोलन केले होते. हैदराबाद मुक्ती लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. शालेय जीवनापासूनच त्यांच्यातील कुशल संघटन कौशल्याचा प्रत्यय येत होता. शालेय शिक्षण सुरू असतानाच, केशवराव धोंडगे यांनी निराळी, रंगारी, न्हावी, मातंग इत्यादी सर्व पचरुड समाजाच्या सर्व मुलांची बैठक घेऊन विठ्ठल मंदिरात व्यायाम सुरू केला होता. व्यायामाचे महत्त्व पटवून देत असतानाच, बैठका घेऊन त्यांनी मुलांची एक संघटनाच तयार केली होती. केशवराव चांगले वक्ते आणि बोलके असल्याने 50 एक मुले एकत्र आली. कंधारच्या सरकारी मिडल स्कूल मध्ये युवकांची संघटना त्यांनी तयार केली. या संघटनेचा प्रमुख चिटणीस आदरणीय भाई गुरुनाथरावजी कुरूडे यांना बनवले. याच संघटनेला पुढे, ‘पुरोगामी युवक संघटना’ असे नाव देण्यात आले.
अंबाजोगाई येथील सरकारी हायस्कूलमध्ये शिकत असताना, अंबाजोगाईत निजाम सरकार विरोधी स्टेट काँग्रेसची चळवळ जोरात होती. त्याचा प्रभाव केशवरावांवर पडला नसता, तरच नवल ! ते ज्या ज्या वेळी अंबाजोगाईहून कंधारला येत, त्या त्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून बैठका घेत. निजामाविरुद्धच्या चळवळी, हैदराबाद मुक्तिसंग्राम आदी बाबत दररोज माहिती देत. दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत तर, दररोज जवळपास 50 विद्यार्थी त्यांच्या अवतीभवतीच असत. विठ्ठल मंदिरात भाईंची भाषणे होत. देशाचे व निजामी राज्यांतल्या चळवळीची माहिती विस्ताराने देत. निजामी सरकार विरुद्ध सत्याग्रह व जागोजाग बंड होत होते. अशा चळवळीत आपल्यासारख्या तरुणांनी सामील झालेच पाहिजे, असे आग्रहाने ते सांगत. त्यांच्या सांगण्याचा चांगलाच परिणाम तरुणांवर झाला. त्यांनी नुसते सांगितलेच नाही तर प्रत्यक्ष कृतीही केली.
1991 साली अगदी अनोखे, आगळेवेगळे, वैशिष्ट्यपूर्ण गुराखी साहित्य संमेलन गुराखी गड येथे सुरू केले. मसनजोग्यांपासून कुडमुड्यांपर्यंत सर्व प्रकारच्या भटक्यांचे हक्काचे गाव त्यांनी वसवून दिले. गुराखी, मसनजोगी, कुडमुडे, भगत, पोतराज अशा सर्वच भटक्यांच्या लोककलांना, लोकसाहित्याला, “नाही रे” वाल्यांच्या हुंकाराला भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेबांनी एक हक्काचे गुराखीपीठ निर्माण करून दिले.
आजानुबाहू असलेले भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब हे अतिशय कुशाग्र बुद्धिमान , खंबीर नेतृत्वगुण असलेले नेते, हजरजबाबी, फर्डे वक्ते, ज्ञानी, प्रगाढ व्यासंगी होते. जनतेबद्दल तळमळ असलेले लोकनेते ते होते. उत्कृष्ट लेखक आणि संपादक होते. “जय क्रांती” या साप्ताहिकाचे संपादन त्यांनी केले. त्यांनी 30 ग्रंथ लिहिले आहेत. राजकारण, समाजकारण, लोक चळवळ, शिक्षण क्षेत्रातील कार्य, साहित्यिक कार्य असे सर्वच कार्य उत्तम दर्जाचे होते. एकूणच, दिवंगत भाई केशवराव धोंडगे साहेबांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. भाई डॉक्टर केशवरावजी धोंडगे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
सुवर्णा बाबुराव कळसे नांदेड.