
धुव्वाधार पावसाने बळीराजा सुखावला.
वसंत खडसे
दै.चालु वार्ता उपसंपादक
वाशिम : संपूर्ण जून महिना उलटूनही पावसाने पाठ फिरवल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. अखेर प्रदीर्घ विश्रांतीनंतर दि. ५ जुलै बुधवारला पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले. लांबलेल्या मान्सूनने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणली होते. पावसाअभावी खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते, मात्र बुधवारी दुपारनंतर जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले परिणामी खोळंबलेल्या पेरण्यांना मुहूर्त सापडल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व हमखास पाऊस पडायचा, त्यामुळे ७ जूनला सुरू होणाऱ्या मृग नक्षत्रात एकजरी दमदार पाऊस झाला, तर खरिपाच्या पेरणीला जोमात सुरुवात व्हायची. परंतु यावर्षी मात्र केवळ मृग नक्षत्रच नव्हे; तर संपूर्ण जून महिना कोरडा गेला. परिणामी खरीपाचा हंगामच धोक्यात येतो की काय..? अशी स्थिती निर्माण झाली होती. गेल्यावर्षी या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात खरिपाची पेरणी होऊन शेतशिवाराने हिरवा शालू परिधान केला होता.
यावर्षी अवकाळीची अडचण न आल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची सर्व कामे आटपून शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाले होते. प्रतीक्षा होती ती फक्त दमदार पाऊस पडण्याची. कारण वेळेत पेरणी झाली तर उत्पन्नात हमखास वाढ होते. असा अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांचा अनुभव आहे. तथापि जून महिना कोरडा गेल्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. जिल्ह्यात अधूनमधून काही भागात मध्यम पाऊस झाल्यानंतर सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा लागून होती. अशातच दि. ५ जुलै बुधवारी दुपारनंतर पावसाचे दमदार आगमन झाले. परिणामी खोळंबलेल्या पेरण्यांना मुहूर्त मिळाल्याने बळीराजा तर सुखावलाच, पण इतर व्यावसायिक लोकही आनंदित झाले आहेत. रिमझिम रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने हवेत गारवा आला असून, पाण्यासाठी आसुसलेल्या सर्व प्राण्यांमध्ये पावसाच्या आगमनाने नवचैतन्य संचारले आहे. शेतशिवारात पेरणीची लगबग सुरू झाल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे.