
सरपंचाच्या पॅनलचे ११ सदस्यांनी केले विरोधात मतदान.
देगलूर: दिनांक १० जुलै २०२३ रोजी देगलूर तालुक्यातील सर्वात मोठी १७ सदस्य असलेली हाणेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचा विरोधात त्यांच्याच पॅनलच्या सदस्यांनी अविश्वास ठराव आणला . दि. १० जुलै रोजी दुपारी दोन वाजता तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास सभा घेण्यात आली. अविश्वास प्रस्ताव ग्रामपंचायत सदस्यांनी दिला होता त्या प्रस्तावाचे वाचन करून दाखवले. यानंतर ११ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केले.
हाणेगाव ग्रामपंचायतची निवडणूक लागल्यानंतर ग्राम विकास पॅनलचे बारा सदस्य निवडून आले सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे सरपंचपदी सौ वैशाली विवेक पडकटवार यांची निवड करण्यात आली. गेल्या अडीच वर्षाच्या काळात सरपंचाने आपल्या मर्जीप्रमाणे काम केले. सदस्यांना विश्वासात न घेणे, आलेल्या योजनाची माहिती न देणे, शासनाचा आलेला निधी परस्पर हडप करणे, एक हाती कारभार यामुळे अविश्वासाच्या अनुषंगाने शालुकाबाई विश्वनाथ चलवे व इतर नऊ ग्रामपंचायत सदस्य यांनी सौ वैशाली वि- वेक पडकंठवार यांच्या विरोधात दिनांक ५ जुलै रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्या अनुषंगाने अविश्वास प्रस्तावा बाबत विशेष सभा दिनांक १० रोजी घेण्यात आली ११ सदस्यांनी
अविश्वासाच्या बाजूने हात वर करून मतदान केले. यामुळे हा अविश्वास ठराव मंजुर करण्यात आला.
यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम, ग्रामविकास अधिकारी बी. जी. उमाटे तलाठी कोडलवाड यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक मधुकरराव जायभाये, यंगाले, पांढरे, आदी कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. अविश्वास ठरावामुळे हाणेगावातील राजकारणाला एक वेगळे वळण लागले असून आता नवीन सरपंच कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…