
राज्याच्या सत्तासंघर्षात शेतकरी वाऱ्यावर…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड : महाराष्ट्र राज्यात राज्यात २०१९ साली महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर तत्त्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. यामध्ये कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार होते.
दरम्यान मागच्या एक वर्षात काही थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झाले. मात्र, दोन टप्प्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले परंतु यानंतरच्या याद्या जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांना कोण वाली नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात झालेल्या खिचडीमुळे कर्जमाफीची घोषणा हवेतच राहिली आहे.
महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आवाज उठवत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा करणार असा सवाल उपस्थित केला होता. परंतु अजित पवारच आता सत्तेत सामील झाल्याने ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देतात का असा सवाल राज्यातील बळीराजाच्या तोंडून ऐकायला मिळत आहे…