
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाची विद्यार्थीनी सौ. वंदना अविनाश गिरी हीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. वंदना गिरी ही देगलूर तालुक्यातील माळेगाव येथील रहिवाशी असून ग्रामीण भागात राहून तिने आपले पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. वै धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली आहे. कोणत्याही अकॅडमीकडे एकही दिवस क्लासेस न करता केवळ स्वयंअध्ययन करून पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारी देगलूर तालुक्यातील पहिली विद्यार्थिनी आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाच्या वतीने तिचा येथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून मनोगत व्यक्त करताना आपल्या स्पर्धा परीक्षेची पायाभरणी ही वै.धुंडा महाराज महाविद्यालयातच झाल्याचे तिने सांगितले. बाहेरील बाजारू अकॅडमीच्या मागे न लागता विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील तासिका नियमितपणे करून नियमित अभ्यास करावा त्यातूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सहजपणे होते. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाज माध्यमापासून कटाक्षाने लांब राहावे असेही तिने प्रतिपादन केले. वंदना गिरीच्या या वाटचालीत सदैव साथ आणि प्रोत्साहन देणारे तिचे पती श्री. अविनाश गिरी यांचाही महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. संजय अवधानी होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गणपत कारिकंटे यांनी केले. प्रा विश्वंभर तिडके यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून कार्यक्रम आयोजनाची प्रतिपादित केली. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा आणि रोजगार मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. रवींद्र बेम्बरे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश कुकाले, प्रा. विठ्ठल जाधव, डॉ आनंद आतनूरकर, डॉ आनंद वळंकीकर, प्रा. अनिल ठोसरे, डॉ गोविंद रामदिनेवार, प्रा. अंजली रोयलावार,डॉ. पुष्पा गायकवाड डॉ. संजीवनी नेरकर यांच्यासह सर्व कला व विज्ञान शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते…