
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काल , सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.विधानसभेत महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करून सभात्याग केला. तर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दिल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. त्यातच विधानसभेच्या तालिका अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली, पण त्यात ठाकरे गट वगळता इतर प्रमुख पक्षाच्या आमदारांचा समावेश आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी चार तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. मात्र, ठाकरे गटाच्या कुठल्याही आमदारांला तालिका अध्यक्ष म्हणून स्थान मिळालेले नाही. तालिका अध्यक्षांमध्ये संजय शिरसाट (शिवसेना), समीर कुणावार (भाजपा), यशवंत माने (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि अमित झनक (काँग्रेस) यांच्या नावाची घोषणा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी केली.
विद्यमान खासदार आणि विधानसभेचे माजी सदस्य गिरीश बापट, सुरेश धानोरकर, माजी सदस्य शंकरराव वाकुळणीकर (कोळकर), बाबुजीराव वाघमारे आणि रामचंद्र अवसरे यांच्या निधनाबद्दल अॅड. राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.