दैनिक चालू वार्ता
कंधार ग्रामीण प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदगाव:-लोहा तालुक्यातील मारतळा ते नांदगाव – चिंचोलीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.नांदगाव चिंचोली ता. लोहा येथून – मारतळ्याला जोडला जाणारा रस्ता पावसामुळे चिखलमय झाला असून रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या रस्त्याने वाहने तर सोडाच मात्र पायी चालणे देखील जिकीरीचे झाले आहे. गावात प्राथमिक शाळेपर्यंतच शिक्षण उपलब्ध असल्याने मुलांना पुढील शिक्षण घेण्यासाठी मारतळा येथे जावे लागते तर गावकऱ्यांना कामानिमित्त मारतळा किंवा नांदेड येथे जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता असल्याने शालेय विद्यार्थांना व गावकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्तावर छोटे-मोठे अपघात हे नित्याचेच झाले असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे. या रस्त्याच्या संदर्भात वेळोवेळी गावकऱ्यांच्या वतीने शासनाकडे मागणीचे निवेदने देऊन त्यावर काहीच प्रक्रिया झालेली नाही. शासनाने याकडे
लक्ष घालून रस्ता मंजूर करून आमचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव जाधव, संतोष भरकडे यांनी गावकऱ्यांच्या वतीने शासनाकडे केली आहे.
