
चिखलदरा येथे पर्यटन वाढीसाठी अधिक जनजागृती व्हावी – आमदार राजकुमार पटेल…
पर्यटकांसह गाविलगड किल्ल्याची सफर…
अमरावती (चिखलदरा) : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्याठिकाणी स्वच्छता व व्यवस्थापन ही बाब महत्वपूर्ण असते.नागरिकांनी आणि स्थानिक प्रशासनाने चिखलदरा येथील पर्यटन स्थळांची स्वच्छता व व्यवस्थापन चांगले ठेवावे.पर्यटन व्यवसायातून येथील परिसर समृद्ध होऊ शकतो.या ठिकाणी पर्यंटन वाढीस चालना मिळण्यासाठी स्थानिकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे,असे आवाहन आमदार राजकुमार पटेल यांनी आज येथे केले.
नगरपरिषद येथे आयोजित चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवाचा समारोप कार्यक्रम प्रसंगी श्री.राजकुमार पटेल बोलत होते.मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे,सिपना कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेश जयपूरकर,नायब तहसीलदार गजानन राजगडे,पोलीस निरीक्षक आनंद पिदुरकर,पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून चिखलदऱ्याची ओळख निर्माण व्हावी यासाठी ‘चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते.मान्सून पर्यटन महोत्सवामुळे येथील कोरकू आदिवासी बांधवांची संस्कृती,जीवनमान,खाद्य पद्धतींची माहिती,चिखलदरा येथील विविध पर्यटन स्थळे व त्यांच्या वारसा यासंदर्भात पर्यटकांना माहिती करून देण्यात आली, से त्यांनी सांगितले.
अमरावती ते चिखलदरा सायकल रॅली,चिखलदरा फन रन,बागलिंगा ते गाविलगड व लिंगणा ते आमडोह पदभ्रमण,गाविलगड किल्ला भ्रमंती वारसा सहल,आदिवासी खाद्य संस्कृती प्रदर्शनी,छायाचित्रण कार्यशाळा व प्रदर्शनी,प्रेक्षणीय चिखलदरा आणि जैवविविधता माहिती सत्र,निसर्ग भ्रमंती आदी विविध कार्यक्रम समारोपीय दिवशी झालीत.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कोरकू बांधवांनी घुंगरू,बासरी आणि ढोलकीच्या तालावर आदिवासी नृत्य सादर करून अतिथींचे स्वागत केले.यावेळी महोत्सवात सहभागी झालेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह वितरीत करण्यात आले.