दैनिक चालू वार्ता
किनवट प्रतिनिधी दशरथ आंबेकर
कोसमेट येथे जिल्हा परिषदेची इ १ ली ते इ १० वी पर्यंतची शाळा असून येथे परिसरातील अनेक वाडी तांड्या वरून विद्यार्थी ये जा करतात. मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास ही योजना शासन राबवत असताना कोसमेट येथील विद्यार्थ्यांना मात्र या योजनेचा लाभ होत नसून बऱ्याच वेळा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पालक व गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर कोसमेट येथून तोटंबा, हुडी, करंजी, कोल्हारी व मुळझरा या गावासाठी बस सुरू झाली परंतु ही बस दररोज व वेळेवर येत नसल्यामुळे तेथून शाळेला ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने महाग व धोकेदायक प्रवास करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना दुर्बल आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी वाहनाने प्रवास करता येत नाही परिणामी ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
याबाबत गावातील पालक व पदाधिकाऱ्यांनी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी तसेच आगार प्रमुख यांना फोन करून संपर्क साधला असता त्यांच्याकडून निराशा जनक उत्तर मिळाले तरी प्रशासनाने याकडे लक्ष घालून विद्यार्थ्यांना मानव विकास योजने अंतर्गत नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी ही गावकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. बस नियमित सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालकांनी व गावकऱ्यांनी दिला आहे…
