
दैनिक चालु वार्ता
मोसमी पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला तसाच शहरवासिय ही आनंदला परंतु हा आनंद सहा सात दिवसच टिकला अन चक्रिवादळाने तो पाऊस पळवून नेला. चक्क पंधरा वीस दिवसांसाठी तो गायबच झाला. मग काय तप्त सूर्यामुळे उष्णतेचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होऊन काही ठिकाणी शेतात काम करणारे शेतकरी उष्माघाताने मृत्यु पावले. धरणातला पाणीसाठा कमी झाला म्हणून पाणी कपातीचे संकट ओढवले. बऱ्याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर एकदाचा पाऊस पुन्हा सुरु झाला, नुसता सुरु नाही झाला तर ढगफुटी होऊन बदाबदा कोसळायला लागला. नद्या नाले ओढे हे थोरले दुथडी भरून वाहू लागले. सखल भागात पूर आले, दुकानातले सामान – धान्य पुरात वाहून गेले. कोकणातील काही गांवात तर चक्क बाजारपेठेत मगरींचा वावर सुरु झाला, सारीकडे नुसती वाताहतच. शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाहून गेले त्यांच्या समोर दुबार पेरणीचे संकट आ वासून उभे राहिले. दुःखी कष्टी होऊन आता दुबार पेरणी कशी करायची हा यक्ष प्रश्न समोर उभा राहिला अतिरिक्त खर्चाचा बोजा उभा कसा करायचा? तर शहरवासिय रेल्वे बंद, रस्ते बंद, यात अडकून पडला. गाड्या वाहून गेल्या, बाळही वाहून गेले अवघ्या सहा महिन्यांचे होते हो!
पूर्वी राजे, महाराजे दिसला डोंगर की बांधावा गड, अगदी गड नाही तरी गढी उभारण्याचे काम करायचे. संरक्षणासाठी, टेहणीसाठी त्याची आवश्यकता होतीच परंतु, आता बरेचसे जीर्ण झाले आहेत, कोसळण्याच्या मार्गावर आहेत. याचा फटका जसा मानव जातीला बसतो आहे तसाच निसर्ग, प्राणी, पक्षी यांनाही बसतोच आहे. अन हे अशा प्रकारे ढगफुटीचे स्वरूप पाहून असे कोसळणे सुरुच राहिले तर भविष्यातही असंच घडत रहाणार याला भविष्य सांगणाऱ्याचीही गरज नाही. निसर्ग वाचवा, निसर्ग जपा आपण फक्त आरडा ओरडा, आक्रोश करायचा, कृतीशुन्य भावनेने अगदी ओढे नाले इतकंच काय समुद्रही बुजवून कॉक्रिटची टोलेजंग जंगले उभी करायचे काही थांबत नाही. हजारो, लाखो कोटी रुपयांच्या नवनवीन योजना उभ्या रहात आहेत अन भविष्यात उभ्या रहाणार आहेतच.
या धुसमुसळ्या ढगफुटीसारखा पाऊस पडून ईर्शाळवाडीतील घरांवर अख्खा डोंगर कोसळून कित्येक घरे त्याखाली गाडली गेली अन कित्येक जणांचे प्राण त्यात गेले, कित्येक संसार उध्वस्त झाले, कित्येक मुलं मुली पोरकी झाली. मागील काही वर्षात डोंगर दरडी कोसळण्याचे प्रमाण फारच वाढत चालले आहे. माणसं बदलली तसा निसर्गही बदलत आहे हे खरंय!
चांदीची ही थेंब फुले या माळून येती सरी
आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी
असा पाऊस पडण्या ऐवजी घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा………. असा ढगफुटी सदृष्य पाऊस ईशालवाडीवर बदाबदा कोसळला अन डोंगरच वाडीवर कोसळला, फक्त मुनुष्य हानी झाली का? ती झालीच पण, निसर्गाचे काय झाले असावे? असा प्रश्न मला पडला. दहा बारा इंच वाढलेले कोवळे लुसलुशीत गवत मस्त खुशाल आनंदात डौलाने वाऱ्यावर डुलत होते, आता कुठे बाळसे धरत होते, त्यालाही मोठे होऊन त्यावर फुले फळे येण्याचे स्वप्न होते, ती सारी स्वप्नें चिखल रेंद्याखाली मातकट होऊन पार चिरडून गेली हो! ईर्शावाडी गावतल्या झाडांवर काही कावळ्यांची घरटी होती, यंदा पडणार्या पावसाच्या अनुमानानुसार झाडांच्या मध्यावर त्यांनी घरटी बांधली होती, सुखनैव संसार त्यांनी थाटला होता. त्यांची इटूकली पिटूकली पिल्ले गुण्यागोविंदानी चार दाणे खाऊन जगत होती, वाढत होती. त्यांचे संगोपन करताना आई बाबांचे पंख अपुरे पडत होते, साठ सत्तर उंबरठ्यांचा गाव तो त्यात गावात गरिबी, रहाणाऱ्या माणसांनाच धान्याचा तुटवडा, त्या कावळ्यांना कुठून हो पोटभर मिळणार? मग दूर दूरदूरवरून पिल्लांना दाणे आणताना त्यांच्या पंखातले बळ हळू हळू लोप पावत होते, तरी चिकाटी काही सोडली नव्हती त्यांनी. त्या बिचाऱ्यांची इवली इवली पिल्लेही मातीच्या ढिगार्याखाली, त्या रगड्याखाली चिरडून मेली हो! तो धुर्त पक्षी कोकिळ त्याने ही या कावळ्यांच्या घरट्यात एकेक अंडे घातले होते तो ही त्याच्या पिल्लांचे कुहू कुहू कोकिळगान ऐकण्यास उताविळ झाला होता………. परंतु हाय त्याचीही पिल्ले अशीच नष्ट झाली, अन आई बाबांना शोक करण्यावाचून दुसरं काही उरलंच नाही. मागील काही वर्षे तिथले रहिवासी जसे इर्शाळवाडीत जायला यायला रस्ता मिळावा अशी मागणी करत होते, तद्वतच हे हुशार कावळेही काव काव करून आक्रोश करून रस्त्याची मागणी करत होते, आम्हाला नको हो पण या गावकर्यांना रस्ता द्या पण ना रहिवाशांच्या मागणीची दखल घेतली गेली ना त्या कावळ्यांची देखिल! कुणाचं कुणाला काय पडलंय इथे? पाच लाखांची मदत प्रत्येक मृत माणसागणीक दिली पण या मेलेल्या पक्षी प्राण्यांच काय?
पूर्वी श्वानांचा प्रजनन काळ हा भादवा लागला की सुरु व्हायचा पण निसर्ग बदलला तसा त्यांच्या वीणीचा हंगाम पाऊस सुरु होतानाच सुरु होतो. त्या वाडीची राखण करणारे काही कुत्रे डोंगर कोसळण्या पूर्वी जणु येणाऱ्या संकटाची चाहूल त्यांना लागली असावी म्हणून भुंकून भुंकून त्यांनी टाहो फोडला होता, ओरडून ओरडून घसा सुकलेले काही श्वान अखेरचा श्वास घेत त्या चिखल मातीच्या रेंद्याखाली अखेरचा श्वास घेता झाले. माणसांची काळजी घेणेत माणुसच कमी पडतोय कुत्री मांजरे पक्षी या शुद्र जीवांना विचारतो कोण? त्यांनाही आपल्या सारखेच हृदय आहे, आपल्या सारखेच रक्त त्यांच्या अंगात सळसळते आहे याची जाणिव ना मानवाला, ना निसर्गाला!
खरंच निसर्ग आता बदलतोय, कोपतोय का? की तो बदला घेतोय? इंद्रधनुचे विलोभनीय रंगरूप लोप पावत आहे, हवा हवासा रिमझिम रेशिम धारांनी बरसणारा पाऊस आता आक्राळ विक्राळ होऊन बदाबदा बादलीतून पाणी फेकावे असा कोसळतो आहे. नजिकच्या वर्षात घडलेल्या घटना पहाता जाणवतंय की निसर्गच आता अतिक्रृर व्हायला लागलाय……………. ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, हे आमची पिढी लहानपणी शिकली अन आत्ताचे बाळगोपाळ इंग्रजी माध्यमातले …..रेन रेन गो अवे कम अगेन अनदर डे ही कविता शिकतात , म्हणूनच म्हटलं मानव बदलला तसा आता निसर्गही बदलत चाललाय…काय होणार भविष्यात..? कुणास ठाऊक..!
®️ सुनिल शरद चिटणीस
२६ जुलै २०२३