गंगापूर शहरातील मुख्य रस्त्याची कामे मार्गी लागणार, ७ कोटी ४० लाखाचा निधी मंजूर…
दैनिक चालु वार्ता गंगापूर प्रतिनिधि
गंगापूर : शहरात मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व शहराची मुख्य लाईफलाईन असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नवीन बसस्थानक यासह प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे ७ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
या संदर्भात माहिती अशी की गंगापूर शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक ते नवीन बसस्टँड पर्यंतचा रस्ता मागील सहा सात वर्षांपासून खराब झाल्याने अनेक सामाजिक राजकीय संघटना व्यक्तींनी अनेकदा आंदोलने करूनही हा प्रश्न सुटत नव्हता त्यासाठी माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी पुढाकार घेऊन आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा केल्यानंतर आ. चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी वेळोवेळी चर्चा करून अजित पवार यांच्या सहकार्यामुळे नगर विकास विभागाकडून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यासंबंधाचे आदेश नगर विकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांच्या सहीने २४ ऑगस्ट रोजी काढण्यात आले असून त्यामध्ये नगर पालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते टेमकर यांचे घरापर्यंत सी.सी. रोड तयार करण्यासाठी १ कोटी ९० लाख, गायके यांचे दुकान ते पंचवटी हॉटेल /नवीन बसस्टँड पर्यंत १ कोटी ९० लाख रूपये, पवार मेडिकल यांचे घर ते राजीव गांधी चौकापर्यंत १ कोटी ९० लाख रूपये, खरेदी विक्री संघ ते नवाबपूर वाडी रस्त्यासाठी ४० लाख, चाउस किराणा ते संतोषी माता मंदिरापर्यंत १ कोटी रूपये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी समाज मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी ३० लाख असे एकूण ७ कोटी ४० लाखाचा निधी मंजूर करण्यात आल्याने शहरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागणार आहे…
