दैनिक चालु वार्ता
प्रभाकर कांबळे सांगोला
सांगोला ता.१८ : त्यासाठी ग्रामीण सुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना सतर्क करणारे फोन,समाज माध्यमांवर दिवसभर वाघाचे फोटो आणि व्हिडिओ तर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पळापळ.मात्र ही सर्व अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. अशी अफवा पसरविणाऱ्या तरुणावर सांगोला पोलिसात अदखलपात्र अहवाल नोंद करण्यात आला आहे.
सुमारे आठवड्यापूर्वी सांगोला तालुक्यातील चिकमहूद अंतर्गत असलेल्या मोरेवस्ती परिसरात बिबट्या दिसल्याने घबराट उडाल्याचे प्रकरण ताजे आहे.या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाच्या वतीने वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत.शिवाय लोक जागृतीसाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. असे असतानाच आज अचानक सकाळपासून समाज माध्यमांवर चिकमहूद अंतर्गत असलेल्या जाधववस्ती परिसरात चक्क वाघ दिसल्याचे फोटो दिसू लागले. त्याबाबतचे विविध व्हिडिओ फिरु लागले.अनेकांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर हे फोटो ठेवले.यामुळे या परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली. वारंवार लोक एकमेकांना फोन करून याबाबत विचारणा करू लागले. सकाळी लवकरच अशा प्रकारची अफवा पसरल्याने लोक शेतामध्ये जाण्यास घाबरू लागले.या परिसरात उसाचे क्षेत्र भरपूर असल्याने लोकांचा संशय आणखीनच बळावत गेला.
त्यातच चिकमहूद येथील पोलीस पाटील निलेश केंगार यांनी ग्रामीण सुरक्षा यंत्रणेच्या संपर्क यंत्रणेवर गावात वाघ दिसला असून नागरिकांनी सतर्क राहावे असा मेसेज दिला.त्याचे सुमारे दोनशेहून अधिक फोन गावातील नागरिकांना आले.त्यामुळे या गोंधळात अधिकच भर पडली.दरम्यान याचवेळी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाधववाडी परिसरात पोहोचले होते. त्यांनी संबंधित ठिकाणाची पाहणी केली व समाज माध्यमांवर अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली.तेव्हा त्यांना महूद येथील शैलेश धनंजय कांबळे(रा.मेटकरवाडी,महूद) याचेबाबत माहिती मिळाली.शैलेश कांबळे हा महूद येथील गॅस वितरण गाडीवर चालकाचे काम करतो आहे.जाधववाडी-मोरेवस्ती येथील गॅस सेवा केंद्रावर त्याचे नेहमी येणे-जाणे असते.स्थानिक नागरिक, पोलीस पाटील यांच्या मदतीने त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने मला वाघ दिसला असल्याचेच सांगितले.त्याचा मोबाईल ताब्यात घेवून तपासणी केली असता त्याच्या मोबाईल मध्ये वाघाचे विविध फोटो व व्हिडिओ सापडले.त्याने मोरेवस्ती येथील एका शिवाराचा फोटो काढून त्यामध्ये गुगल वरून वाघाचा फोटो टाकला होता.आणि हे फोटो स्टेटसला ठेवून लोकांमध्ये दहशत पसरवली.ही बाब तपासात पुढे आल्यानंतर वनपाल सुग्रीव लिंबा मुंढे यांनी शैलेश धनंजय कांबळे याच्या विरोधात सांगोला पोलिसात मोबाईल वरती वाघ आला आहे अशी दहशत पसरवल्याबद्दल अदखलपात्र अहवाल नोंद केली आहे.
चौकट- १) जाधववाडी मध्ये वाघ दिसल्याची चर्चा सकाळपासून सुरू झाली.स्थानिकांकडे चौकशी केली असता,त्यांनीही त्यास दुजोरा दिल्याने ग्रामीण सुरक्षा यंत्रणेमार्फत लोकांना सतर्क करण्यासाठी फोन केले. मात्र नंतर ही अफवा असल्याचे लोकांना कळविले आहे.- निलेश केंगार,पोलीस पाटील चिकमहूद
चौकट- २) चिकमहूद परिसरात अद्याप पर्यंत बिबट्या अथवा पट्टेरी वाघ आढळला नाही.तरीही सुरक्षिततेचे उपाय राबविले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी वन कर्मचारी जागृती करत आहेत. अफवा पसरविणाऱ्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत.- तुकाराम जाधवर,
वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला…