
प्रतिनिधी/राखी मोरे
दैनिक चालु वार्ता/पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अलायंस ऑफ यूनिवर्सिटज टू रीइन्फोर्स टीचर ट्रेनिंग करिक्युला टू आउटकास्ट रॅडीकॅलिजम अँड प्रमोट इक्वॅलिटी इन एशियन सोसायटीज ( AURORA) च्या आठव्या अभ्यास दौऱ्याचे आणि आंतराराष्ट्रीय परिषदेचे मंगळवारी उद्धाटन करण्यात आले. त्यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आम्ही सकारात्मक शैक्षणिक बदलांसाठी कटीबद्ध आहोत, असे प्रतिपादन केले.यावेळ स्पेनमधील मलागा विद्यापीठाचे डॉ. होसे जेजुस डेलगाडो पेना, जयपूरमधील बनस्थली विद्यापीठाचे प्रा. अजय सुराणा, स्वित्झर्लंडमधील यूरोपियन यूनियनचे डॉ. कार्लोस मॅकॅडो, जर्मनीमधील अरोराच्या सल्लागार एलिजाबेथ स्मिथ, नेपाळमधील राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. रामकृष्ण तिमालसेना, नेपाळमधील त्रिभूवन कॉलेजचे संचालक डॉ. पूर्णा बहादूर काडेल, तामिळनाडूमधील अनुग्रह इंस्टीट्यूटच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. साईराज सँटीगो, नेपाळमधील पोखरा विद्यापीठातील प्रा. टेक बहादूर क्षत्री, मुंबईतील अड्यूलॅबचे प्रतिक गांधी यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकार, प्रभारी कुलसचिव आणि अरोराचे टीम लिडर डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाला भारतासह चेक रिपब्लिक,आयर्लंड, नेपाळ, रोमानिया, स्पेनमधील जवळपास ५० सदस्य उपस्थित होते. चार दिवस चालणाऱ्या या अभ्यास दौऱ्यादरम्यान अरोराचे शिष्टमंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित ३ महाविद्यालयांनी भेट देणार आहे. तर १५ डिसेंबरला ‘कट्टरतावादाशी लढा’ (कम्बॅटींग रॅडीकॅलिजम) या विषयावर अरोराच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत ‘समावेशक शिक्षण’ आणि ‘सक्रिय नागरिकत्व’ याविषयावर दिवसभर चर्चा होणार आहे.अरोराच्या माध्यमातून आपण शैक्षणिक क्षेत्रात जो बदल घडवून आणू इच्छितो तो बदल स्विकारण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठही अशाच विविध उपक्रमांद्वारे शिक्षणात लैंगिक, सामाजिक समानता यावी यासाठी प्रयत्नशील आहे, असेही डॉ. गोसावी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तर सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण क्षेत्रात सर्वसमावेशकता आणण्यासाठी ‘अरोरा’ काम करत आहे. शिक्षणात लिंग समानता, सामाजिक समानता, सामाजिक न्याय यांचा समावेश होऊन एक ग्लोबल कम्युनिटी निर्माण करणे हे ‘अरोरा’चे उद्दिष्ट असल्याचे स्पेनमधील मलागा विद्यापीठाचे डॉ. होसे जेजुस डेलगाडो पेना यांनी यावेळी सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उच्च शिक्षण क्षेत्रातील क्षमता बांधणी प्रकल्पात (सीबीएचई) सहभागी आहे. त्या अंतर्गत सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ अलायंस ऑफ यूनिवर्सिटज टू रीइन्फोर्स टीचर ट्रेनिंग करिक्युला टू आउटकास्ट रॅडीकॅलिजम अँड प्रमोट इक्वॅलिटी इन एशियन सोसायटीज ( AURORA) चाही एक सक्रीय सदस्य आहे. चेक रिपब्लिक,आयर्लंड, नेपाळ, रोमानिया, स्पेन आणि भारत या सहा देशातील ११ शिक्षण संस्था या प्रकल्पाचे सदस्य आहेत. ज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचाही समावेश आहे. ‘अरोरा’ या प्रकल्पाला युरोपियन कमिशनच्या सहाय्याने निधी सहाय्य मिळत असून विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे हे या प्रकल्पाचे टीम लिडर आहेत.