
- दै चालु वार्ता प्रतिनिधी :पुणे/पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥ जगद्गुरु संत तुकोबारायांनी आपल्या अभंगामध्ये सांगितले आहे की कोणतीही असाध्य किंवा अवघड गोष्ट निरंतर अभ्यास केल्याने साध्य होत असते.
वारकरी संप्रदायचा दांडगा इतिहास असलेल्या देहूची लोकसंख्या साठ हजारांच्या आसपास आहे. घरी अभ्यास करण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अभ्यासासाठी एक शांत, स्वच्छ आणि पोषक अशी जागा असावी हि गरज लक्षात घेऊन एक् वर्षांपूर्वी यशस्वी अभ्यासिकेची सुरुवात झाली. ग्रामीण भागातील जे युवक, युवती स्पर्धा परीक्षा देतात त्यांच्यासाठी चालवली जाणारी ही अभ्यासिका हे एक आदर्श सेवाकार्य आहे.
तीर्थ क्षेत्र देहू येथे मार्च 2023 मध्ये ही अभ्यासिका सुरू केली. अभ्यासिका सुरू झाली तेव्हा वर्षभर ही अभ्यासिका एका छोट्याशा खोलीत सुरू करण्यात आली होती. मात्र सुरुवातीचा कालखंड खूप कठीण आणि खडतर ठरला. सुरवातीला प्रतिसाद ही फारसा नव्हता स्पर्धा परीक्षा तयारी करणारे दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी असे चार विद्यार्थी अभ्यासिकेत नियमित येत असत. त्यानंतर अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हळू हळू वाढत गेली.
UPSC, MPSC, NDA, RRB, IBPS, NEET, JEE, NET, CA, MEDICAL, JUDICIARY, PSI/ASO/STI, HSC, SSC, पोलिस भरती तसेच अन्य स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका चालवली जाते या अभ्यासिकेला आता चांगले रूप प्राप्त झाले आहे.
अभ्यासिकेमध्ये देहू आणि आसपासच्या सांगुर्डी, येलवाडी, तळवडे, माळवाडी, सुदुंबरे, इंदोरी, खालुंब्रे आदी आठ-दहा गावांमधील, पाड्यांमधील एकूण चाळीस विद्यार्थी, विद्यार्थिनी नियमितपणे येतात. विद्यार्थी पहाटे ५ ते रात्री १२. ०० या वेळेमध्ये अभ्यासिकेत अभ्यास करतात. MIDC मध्ये नोकरी करून सरकारी नोकरीचे स्वप्न युवक युवती पाहतात कामाच्या ठिकाणी मोकळ्या वेळेत अभ्यास करतात अश्या विध्यार्थ्यांसाठी देहूमध्ये अभ्यासिका उपलब्ध झाल्याने अभ्यासिका खूप लाभदायक ठरली आहे. अश्या विध्यार्थ्यांसाठी रात्री जास्त वेळ अभ्यासिका चालू असते. अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थ्यांना संचालक प्रकाश कांबळे सर संचालिका सौ. मंगल कांबळे मॅडम तसेच अधिकारी झालेले माजी विद्यार्थी वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
अभ्यासिकेत इंटरनेट, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, लाईट इन्व्हर्टर, CCTV यंत्रणा, लॉकर या सारख्या सुवीधा पुरवल्या आहेत. अभ्यासिकेतील शांत व स्वच्छ वातावरणात अभ्यास करून ग्रामीण भागातील युवक, युवती स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळवत आहेत.
प्रसिद्धा रूपनवार (मंत्रालयीन क्लार्क व पुणे विभाग तलाठी) , राधा शिंदे (विक्री कर निरीक्षक),कृष्णा वायकर (CA परीक्षा उत्तीर्ण ), माजी सैनिक संदीप खैरे (वनरक्षक ठाणे विभाग), माजी सैनिक भगवान सपाट (महसूल सहाय्यक) मागील वर्षी अभ्यासिकेतील या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच मागील महिन्यात झालेल्या NEET २०२४ या परीक्षेत ६ विद्यार्थ्यांनी चांगले मार्क मिळवेले आहे. अभ्यासिकेमधील शांत व स्वच्छ वातावरणामुळे गुणांमध्ये १० ते २० % वाढ झाल्याचे विध्यार्थ्यानी सांगितले आहे.
अभ्यासिकेकरीता कार्यक्षम नगरसेवक प्रविण दादा काळोखे यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी या अभ्यासिकेच्या माध्यमातून उत्तम अभ्यास करून त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात चांगले यश मिळवत आहेत. अभ्यासिकेचा हा उपक्रम स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे श्री क्षेत्र देहू मधील यशस्वी अभ्यासिका ही देहूगावाच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. अभ्यासिकेचा देहूतील युवक युवतींनी लाभ घ्यावा.