
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : शिरूर तालुक्यातील दहिवडी गावच्या मांजरेवस्ती शिवारात १० वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना दहिवडी गावच्या मांजरेवस्ती शिवारात शुक्रवारी २१ जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.यश शरद गायकवाड (वय-१०) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यश दुपारी घराच्या मागील बाजूस शौचास गेला होतं. त्यावेळी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला उसाच्या शेतात ओढत नेले. बराच वेळ झाला तरी यश येईना का? म्हणून यशच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली असता तेथील उसामध्ये विचित्र अवस्थेत यशचा मृतदेह आढळून आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पिंजरे नेमके कुठे आहेत?
बिबट्याने परिसरातील गावांच्या आखाड्यावरील पाळीव जनावरे याआधी फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत.औपचारिक पंचनामे करून वनविभागाने शेतकऱ्यांना फक्त गोंजारले आहे. बिबट्याला जेरबंद करणे वनविभागाचे कर्तव्य असताना पिंजरे नेमके कुठे आहेत? हा संशोधनाचा विषय असून, आज बिबट्यामुळे शेतकरी त्रस्त असल्याने वनविभाग मात्र हातावर हात धरून बसलेले आहे.
पिकांना पाणी देताही येईना…
शिरूर तालुक्यातील उरळगाव दहिवडी , न्हावरे, पारोडी, टाकळी भिमा परिसरात बिबट्याची दहशत झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मेंढपाळ व पशूपालन करणाऱ्यांना डोंगरावर गुरे-ढोरे चारण्यासाठी घेऊन जाणे कठीण झाले आहे. तसेच बिबट्याच्या भीतीने रात्रीचे पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने पिकांना पाणी असूनही पाणी देता येत नाही.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण…
या भागातील अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेळ्या-मेंढ्या पाळतात. त्यांच्यामध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शेतमजूर कामाला बाहेर पडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्याचे गांभीर्य नसल्याने वनविभागाची अकार्यक्षमता नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
– राहुलदादा करपे
– सामाजिक कार्यकर्ते