
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी
किशोर फड ,बीड/अंबाजोगाई
ऐतिहासिक भव्य अश्व रिंगण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा
अंबाजोगाई येथे गेल्या अनेक वर्षापासून आयोजित करण्यात येणाऱ्या संतश्रेष्ठ नामदेव महाराज तसेच संतश्रेष्ठ जनाबाई आणि इतर पालख्यांचा भव्य अश्वरिंगण सोहळा शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आला असून या अश्वरिंगण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सोहळ्याचा आनंद या पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन संयोजक व स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे.
अशा प्रकारचा अश्वरिंगण सोहळा मराठवाड्यामध्ये आषाढी यात्रेनिमित्त संपन्न होणारा हा पहिलाच गोल अश्व रिंगण सोहळा आहे. याशिवाय रिंगण सोहळ्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. हा सोहळा नसून वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ अशा गुरु- शिष्यांच्या भेटीचा योग आहे. भागवत संप्रदायामध्ये आद्य अभंग रचयीता म्हणून संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची ओळख आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका सर्वदूर पसरवली. अखंड भारतामध्ये संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी भागवत धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी अखंडितपणे काम केलं. शीख धर्मातील सर्वश्रेष्ठ गुरु ग्रंथसाहिब या ग्रंथामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या रचना समाविष्ट आहेत यावरून त्यांचं थोरपण लक्षात येऊ शकेल. भागवत धर्मामध्ये सर्व जाती-धर्माच्या संतांनी भक्तीचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. सर्व बारकऱ्यांचं अधिष्ठान पांडुरंग परमात्मा हाच केवळ श्रेष्ठ असून कर्मकांडाला तिलांजली दिलेली आहे माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा साधा आणि सोपा अर्थ सर्वसामान्य लोकांसाठी खुला केला. माऊलींचे हे कार्य संत श्रेष्ठ नामदेवरायांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून पुढे नेलं. आषाढी वारी निमित्त संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची पालखी नरसी नामदेव येथून पंढरपूरसाठी प्रस्थान करते तर संत श्रेष्ठ जनाबाई यांची पालखी गंगाखेड येथून पंढरपूरसाठी प्रस्थान करते. या गुरुशिष्यांची पहिली भेट माता योगेश्वरीच अधिष्ठान असणाऱ्या आणि आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांची समाधी असणाऱ्या, दासोपंतांची कर्मभुमी असणाऱ्या अंबाजोगाई या पवित्र भूमीमध्ये होते. या गुरुशिष्यांची भेट घडवून आणण्यासाठीच केवळ अंबाजोगाई येथील अश्व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते अश्व रिंगण सोहळा म्हणजे समस्त वारकरी बांधवांना उत्साह देणारा, पांडुरंग रायाचा भेटीची आस वाढवणारा असा सोहळा होतो. या सोहळ्यामध्ये भजन कीर्तनाची
असतेच परंतु त्यासोबतच वारकऱ्यांचे पाऊल, हमामा, हुतुतु, कबड्डी, कुस्ती असे विविध खेळ सोहळ्यामध्ये आयोजित केले जातात. या दोन्ही पालख्यांचे स्वागत अंबाजोगाईकरांच्या वतीने संत भगवान बाबा चौक याठिकाणी केले जाते.. त्या ठिकाणी अश्व रिंगण सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे हे निमंत्रण घेऊन चिचखंडी येल्डा या परिसरातील वारकऱ्यांची दिंडी संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या पादुकांच्या चरणी लीन होते. संत श्रेष्ठ नामदेवरायांना अश्व रिंगण सोहळ्याचे निमंत्रण दिले जाते आणि मग तेथून सर्व पालख्या विठुनामाचा जयघोष करत अश्व रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी योगेश्वरीच्या मैदानाकडे रवाना होतात. योगेश्वरीचे मैदान प्रतिवर्षी अश्व रिंगण सोहळा पाहण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी गजबजून गेलेले असते. याची देही याची डोळा हा सोहळा साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक भाविक भक्तांची धडपड चाललेली असते. अश्व रिंगण सोहळा उत्तरोत्तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रचलित होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी नंदकिशोर मुंदडा यांच्या वतीने बाल वारकरी समूह दिंडी नृत्य स्पर्धेचे आयोजन केलेले असून इयत्ता पहिली ते चौथी पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये या स्पर्धा संपन्न होणार आहेत. प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकांना 3101 प्रथम पारितोषक 2001 द्वितीय पारितोषक 101 तृतीय पारितोषक 501 उत्तेजनार्थ पारितोषिक व सर्व विजेत्यांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. उत्कृष्ट नियोजन आणि गुरु-शिष्यांच्या भेटीचा अपूर्व योग यासाठी या सोहळ्याची वेगळी ओळख आहे. सर्व भाविकांनी शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी दुपारी १ वा. आयोजित बाल वारकरी वेषभुषा स्पर्धेचा व अश्व रिंगण सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष नंदकीशोर मुंदडा, दिलीप सांगळे, प्रकाश बोरगावकर, बाबा महाराज जवळगावकर, दिलीप गीत्ते, बळीराम चोपणे, अनंत अरसुडे, शशिकांत गायकवाड, शैलेश स्वामी, वैजनाथ देशमुख, प्रशांत अदनाक, महारुद्र शास्त्री खाडे महाराज, हभप किसन महाराज पवार, गोविंद महाराज सुक्रे, अमोल महाराज घोडके यांच्या वतीने करण्यात येत आहे संयोजन समितीतील सर्व सदस्य व वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.