
दै चालु वार्ता प्रतिनिधी पुणे/पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
“कन्या सासूऱ्यासी जाय ।मागे परतोनि पहाय।तैसे झाले माझ्या जिवा ।केंव्हा भेटशील केशवा। चुकलिया माय । बाळा हुरहुरी पाहे।जीवना वेगळी मासळी । तैसा तुका तळमळी।”
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानेश्वर माऊली तुकाराम.. या नमोघोषात टाळ मृदुंग ,आणि हरिनामाचा गजर आणि पावसाच्या सरी अंगावर झेलत ,सारे देहभान विसरून वारकरी सांप्रदायाच्या ठेक्यावर नाचणारे वारकरी भाविक भक्त ,अशा भक्तिमय वातावरणात ,आणि लाखो वैष्णवांच्या उपस्थित संत तुकाराम महाराज ३३९ व्या पालखी सोहळ्याचे सायंकाळी ५ वाजता मुख्य मंदिरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
देहूगाव हे भक्तीपंथाचे महान केंद्र असून भक्तीपंथ उत्तरात्तर वृंदीगत व्हावा ,अखंड चालावा ,संसार शिणाने कष्टलेल्या जीवांना आपले गाऱ्हाणे सांगता यावे व दिलासा मिळावा ,सकळ कल्याणाचा वर्षाव करणाऱ्या ईश्वर प्रेमियांचा भेटी गाठी वारीच्या वाटचालीत सतत होत असतात. म्हणूनच पंढरीला जाऊन पांडुरंगाकडे काय मागेच तर प्रेमच आणि हे प्रेम मागण्यासाठी हा वैष्णवांचा मेळा आज शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता श्रोक्षेत्र देहूगाव येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघाला आहे .चंद्रभागेच्या वाळवंटी पांडुरंगाच्या भक्तांनी मांडलेला हा भक्तीचा खेळ आहे.म्हणूनच तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात
“टाळ घोळ सुख नामाचा गजर।घोष जयजयकार ब्रम्हानंदू ।गरुड टक्के दिंडी पताकांचा भार।आनंद अपार ब्रम्हादीका।आनंदे वैष्णव जाती लोटांगणी।”
“पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त धार्मिक कार्यक्रम”
पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त पहाटे ५ वाजता ,संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात संस्थांचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे विश्वस्त संजय महाराज मोरे पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे , विठ्ठल रखुमाई मंदिरात श्रींची पूजा , पुरूषोत्तम महाराज मोरे ,विश्वस्त संजय महाराज मोरे ,पालखी प्रमुख भानुदास मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
तर पहाटे ५ : ३० वाजता तपोनिधी नारायण महाराज पालखी सोहळा जनक समाधी येथे हभप पुरूषोत्तम महाराज मोरे ,पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे विश्वस्त संतोष महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
पादुका डोईवर घेऊन जाण्याचा मान मसलेकरांना
संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना घोडेकर सरसफ यांच्या कडून चकाकी देण्याचे काम झाल्यानंतर शुक्रवार ( ता.२८ ) रोजी परंपरेनुसार हभप सतीश सोळके अर्थात मसलेकर महाराज ( बीड जिल्ह्यातील मसले या गावातील मूळ रहिवासी) यांनी आपल्या डोईवर पादुका घेऊन इनामदार साहेब वाड्यात आणल्या.त्या ठिकाणी संत तुकोबारायांच्या पादुकांना महाभिषक व महापूजा झाल्यानंतर मसलेकरं महाराज यांनी सकाळी १२ : ३० वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुका आपल्या डोईवर ठेवून मुख्य मंदिरात आणल्या. मंदिर प्रदक्षिणा घालून या पादुका मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या.
*मुख्य मंदिरात पादुकांना महाभिषक ,महापूजा व महा आरती*
खासदार श्रीरंग अप्पा बारणे , खासदार सुनेत्रा पवार ,मावळचे आमदार सुनील शेळके ( सपत्नीक ) , आमदार महेश लांडगे आमदार अश्विनी जगताप ,तसेच देहू देवस्थान चे अध्यक्ष ,विश्वस्त ,पालखी सोहळा प्रमुख यांच्या यांच्या हस्ते संत तुकोबारायांच्या पादुकांना पंचामृताने महाभिषक करून महापूजा करण्यात आली.आणि या ठिकाणी पहिली आरती करण्यात आली. परंपरेनुसार सुभाष टंकसाळे यांच्या पौरोहित्याने ही महापूजा करण्यात आली.त्यानंतर विधीवत अशा पद्धतीने संत तुकाराम महाराजांच्या पादुका, फुला पानांनी सजवलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या.या निमित्त सकाळी दहा ते १२ या वेळेत हभप देहूकर महाराज यांची किर्तन सेवा झाली.
“सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळ्याचे प्रस्थान”
संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवल्या नंतर परंपरेनुसार समस्त दिंडीकरी वारकरी भाविक भक्तांनी “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ,ज्ञानेश्वर माऊली , तुकाराम महाराज की जय अशा जयघोषात पावसाच्या सरी अंगावर झेलत ,सारे देहभान विसरून टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर नाचणारे वारकरी भाविक भक्त अशा मोठ्या भक्तिमय वातावरणात मुख्य मंदिरातून पालखी सोहळ्याने प्रस्थान केले.”
मुख्य मंदिराच्या बाहेर आल्या नंतर महाद्वारात अभंग घेऊन व गोल फेरी घेऊन हा पालखी सोहळा रात्रीच्या मुक्कामासाठी इनामदार साहेब वाड्यात विसावला.