
आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्यासह शिष्यवृत्तीचे वाटप
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी – अनिल पाटणकर
भोर,जि.पुणे : येथील दुर्गम डोंगरी भागात राहणाऱ्या अनाथ, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय जीवनात येणाऱ्या अडचणींचा विचार करून तालुक्यातील टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने अशा विद्यार्थ्यांना यावर्षी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मोफत शैक्षणिक साहित्य,संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि शिष्यवृत्तीचे वाटप नुकतेच आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
टिटेघर येथील कै.आण्णासाहेब पाटील सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी आदर्श ग्रामपंचायत कशी निर्माण होते याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले तर शाहीर रंगराव पाटील यांनी शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे, आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर, निस्वार्थी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन भोसले, सामाजिक कार्यकर्ते राजेश कुडले, बापू आवाळे, पंडित गोळे, माऊली बदक यांचेसह टिटेघर गावच्या सरपंच शशिकला नवघणे,उपसरपंच शंकर सणस यांचेसह पंचक्रोशीतील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले कि, “ गेली २४ वर्ष या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजकार्य करण्यात आली आहेत मात्र यामध्ये कुठेही वैयक्तिक नावाला मोठेपणा देण्यात आला नाही आणि त्यामुळेच दिवसेंदिवस प्रतिष्ठानचे कार्य आदर्शवत होत आहे.” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल दानवले यांनी केले तर आभार राजीव केळकर यांनी मानले.
(लोकप्रतीनिधीनीही लक्ष देण्याची गरज)
ऐतिहासिक, नैसर्गिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचा असलेल्या भोर तालुक्यातील रायरेश्वरच्या परिसरातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या मात्र आजही अनेक अडचणींचा सामना करीत आहेत त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी सामाजिक संघटनांच्या सोबत लोकप्रतीनिधीनीही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.