दै.चालु वार्ता,जव्हार,प्रतिनिधी,दिपक काकरा.
जव्हार:-महाराष्ट्र राज्य शालांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेण्यात आलेल्या सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील जव्हार तालुक्यातील १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांचा तसेच पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा जनजाती विकास मंच,जव्हार आणि केशव सांस्कृतिक मंडळ पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने जव्हारच्या प्रगती प्रतिष्ठान येथे गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.जनजाती विकास मंच गेल्या आठ वर्षापासून जव्हार तालुक्यात अनेक लोकपयोगी कार्य करीत असून त्यातील हा एक गुण गौरवाचा समारंभ.आदिवासी बहुल अशी ओळख असणाऱ्या जव्हार तालुक्यातील खेडोपाड्यातील सर्व शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण करून भविष्यात शिक्षणासाठी या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी व उच्चशिक्षित होऊन आधुनिकतेच्या युगामध्ये विकासाच्या मुख्यप्रवाहात विद्यार्थी यावेत या उद्देशाने या कार्यक्रमातचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या गुणगौरव समारंभात जनजाती विकास मंचाने आदिवासी समाजातील अनेक क्षेत्रातील विविध पदावर कार्यरत असणाऱ्या हिऱ्यांचा शोध घेऊन या हिऱ्यांना निमंत्रित करून नवख्या अशा १० वी आणि १२ वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या रत्नांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले.या आदिवासी समाजातील आदर्श रत्नांमध्ये आरोग्य क्षेत्रातील पालघर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रामदास मराड,कृषी विभागातील दापचरी येथे कार्यरत असणारे कृषी अधिकारी राहुल गायकवाड,पालघर जिल्हा जात पडताळणी समितीच्या नयना गावित,जव्हार कॉलेजचे प्राध्यापक अभिजीत बांबरे,वाडा येथे विद्युत महामंडळात उपविभागीय अभियंता पदावर कार्यरत असलेले शैलेश सयाम,कायदा क्षेत्रातील ॲड.गणेश आचारी,सेवानिवृत्त सैनिक हेमंत चौधरी आणि जव्हार भारती विद्यापीठाचे प्राचार्य तरवारे अशा विविध क्षेत्रात पारंगत असणाऱ्या व्यक्तींनी या समारंभात आपला सहभाग नोंदवला होता.
दरम्यान या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना या रत्नांनी आपल्या क्षेत्रातील विविध अनुभवांचे कथन करतांना उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भविष्यात १० वी आणि १२ वी तसेच पदवीधर नंतर शिक्षणाची योग्य दिशा कोणती असावी याची माहिती देऊन जनजाती विकास मंचाने तालुक्यातील मागास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा केलेला हा सन्मान भविष्यात त्यांना नक्कीच नवी दिशा आणि प्रोत्साहन देईल असेही त्यांनी आवर्जून सांगितले.या गुणगौरव समारंभात जनजातील विकास मंचाने सुयोग्य नियोजन करून समाजात एक नवी दिशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
