दै.चालु वार्ता
भोकर प्रतिनिधी
विजयकुमार चिंतावार
भोकर :-भोकर तालुक्यात मागील २४ तासापासुन होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे सर्वच नद्या नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर आले असून दि.०३ ऑगस्ट रोजी दुपारी ०२ वाजताच्या सुमारास सुधा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले मौजे रेणापूर येथील दोन युवक वाहून गेल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे.
भोकर तालुक्यात शनिवारपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने परिसरातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. आतापर्यंत एकुण सरासरी ६८२.८० मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सुरेश घोळवे यांनी तालुक्यातील नागरिकांना वेळोवेळी सावधानतेचा इशारा देत असतानाही दि.०३ ऑगस्ट रोजी मौजे रेणापुर येथील पाच तरुण सुधा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने श्रीनिवास भरत मुळेकर (वय २० वर्षे) व यश संदीप भगत (वय २१ वर्ष) हे दोघेजण वाहून गेले. हे दोघेही आई – वडिलांना एकूलते एकच होते. इतर तिघेजण परिस्थिती पाहुन नदीपात्रात न उतरल्याने ते बचावले. त्यानी आरडा ओरड करून लोकांना मदतीची हाक दिली. दरम्यान त्यांना मदत मिळेपर्यंत पाण्याच्या वेगाने चालू असलेल्या प्रवाहात हे दोघेही अदृश्य झाले. घडलेली घटना भोकर तहसीलचे तहसीलदार यांना समजताच त्यांनी आपल्या महसूल कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहिमेचे कार्य जोमाने सुरू केले. या बचाव कार्यात रेनापुर तसेच कोळगाव (बु.) येथील ग्रामस्थ मंडळी मदत करीत आहेत. परंतु अद्यापही या दोनही युवकांचा शोध लागलेला नाही अशी माहिती भोकरचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावरून दिली. या घडलेल्या हृदय द्रावक घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.