
दैनिक चालु वार्ता,
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ जी व राष्ट्रीय महामार्ग एनएच -६५ महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या गौण खनिजाचे उत्खनन एन.पी. इन्फ्रा. प्रोजेक्ट्स प्रा.लि. या कंपनीकडून जिल्हा परिषद मालकीच्या शेटफळ हवेली येथील पाझर तलावातून सुरू आहे, या ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यावर तलावातून अवैध्य मुरूम उत्खनन केल्याचे आढळून आल्याने तहसीलदारांनी एन. पी .इन्फ्रा. प्रोजेक्ट्स प्रा.लि. या कंपनीस नोटीस बजावली.
त्या नोटीस द्वारे कंपनीस कळविण्यात आले आहे की, आपण शेटफळहवेली तलावामधुन ४५८ ब्रास अवैध मुरुम उत्खनन करुन विनापरवाना वाहतुक केले बाबत तलाठी शेटफळ हवेली यांनी संदर्भिय अहवाल पंचनामासह या कार्यालयास सादर केलेले आहे. सबब सदर अहवाल पाहता आपलेकडे गौणखनिज उत्खनन व वाहतुकीकरीता कोणताही परवाना नसल्याचे निदर्शनास येते. तसेच आपण उत्खनन व वाहतुकीकरीता जमीन गट खाणकाम आराखड्यामध्ये समाविष्ट करुन उत्खनन व वाहतुक परवाना करीता अर्ज दिल्याचे दिसुन येत नाही. तरी देखील आपण विना परवाना मुरुम उत्खनन केल्याचे दिसुन येते. सबब सदर नोटीस मिळताच २४ तासांत आपला खुलासा माझे समक्ष करणेत यावा. अन्यथा सदर नोटीसीस आपले काहीएक म्हणणे नाही असे समजुन महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार कारवाई केली जाणार असल्याचे इंदापुर तहसीलदार जीवन बनसोडे यांनी नोटीस मध्ये म्हटले आहे.