
नवी दिल्ली : इस्रायलने शुक्रवारी लेबनॉनमध्ये केलेल्या बॉम्बहल्ल्यात हिजबुल्लाहचा टॉप कमांडर हसन नसराल्लाह मारला गेला. हसन नसराल्लाह याच्या मृत्यूनंतर हा संघर्ष संपण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण त्याच्या मृत्यूनंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. लेबनॉनवर इस्रायलचा बॉम्बवर्षाव अद्याप सुरुच आहे. हा संघर्ष कधी थांबणार, हे कुणालाच माहित नाही. दरम्यान, इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला यांच्यात संघर्षाचे नेमके कारण काय ? इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाह दहशतवाद्यांव्यतिरिक्त अनेक सामान्य लोकही मारले जात आहेत. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायल सातत्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करत आहे. पण, याचा परिणाम लेबनॉनमध्ये
राहणाऱ्या सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे.
इस्रायल-हिजबुल्ला संघर्षाचे कारण
इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. हिजबुल्ला पॅलेस्टाईन समर्थक असल्यामुळे इस्रायलला आपला शत्रू मानते. तसेच, हिजबुल्ला आमच्या सीमेवर सतत हल्ले करत असल्याचा आरोप इस्रायल सुरुवातीपासून करत आहे. पण, या संघर्षाचे मूळ दोन्ही देशांचे धर्म आहे. या दोन्ही देशांना आपापल्या धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करायचे आहे. इस्रायल ज्यू धर्मासाठी लढण्याचा दावा करतो, तर हिजबुल्ला इस्लामसाठी लढतोय.
धर्माच्या वर्चस्वासाठी संघर्ष
इतिहास पाहिला तर आपल्याला असे दिसून येते की, कोणत्या धर्माने वर्चस्व गाजवावे, यासाठी गेली 100 वर्षे संघर्ष सुरू आहे. 1920 मध्ये लेबनॉनमध्ये सुमारे 75-80 टक्के ख्रिश्चन होते. पण फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकसंख्येची रचना बदलू लागली. पॅलेस्टाईन आणि सीरियातून मोठ्या संख्येने निर्वासित देशात येऊ लागले. सत्तेच्या वाटणीवरून ख्रिश्चन, सुन्नी मुस्लिम आणि शिया यांच्यात परस्पर संघर्ष होता.
गृहयुद्धामुळे लेबनॉनची रचना बदलली…
सत्तेवर वर्चस्वासाठी 1975 ते 1990 पर्यंत देशात गृहयुद्ध झाले. या गृहयुद्धाने लेबनॉनला पूर्णपणे बदलून टाकले. ख्रिश्चन आणि मुस्लिम वर्चस्वावरील या गृहयुद्धात एक लाख ख्रिश्चन मारले गेले आणि सुमारे 10 लाख ख्रिश्चन देश सोडून पळाले. देशात गृहयुद्ध सुरू झाले, तेव्हा 50 टक्के ख्रिश्चन आणि सुमारे 37 टक्के मुस्लिम होते. गृहयुद्ध संपल्यानंतर 47 टक्के ख्रिश्चन आणि 53 टक्के मुस्लिम झाले. या क्षणी लेबनॉनमध्ये ख्रिश्चनांची सध्याची संख्या सुमारे 15 टक्के आहे, तर 85 टक्के मुस्लिम आहेत.