
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच धर्तीवर जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरात लवकर निश्चित करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांनी वेग पकडला आहे.
यातच आता महायुतीचे तीनही प्रमुख नेते अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. पण दिल्लीला रवाना होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपघातातून थोडक्यात बचावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मूळ गाव असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता.18) ते हेलिकॉप्टरने पुण्याच्या दिशेने स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश चिवटे आणि विशेष कार्य अधिकारी कवळे यांच्यासोबत मार्गस्थ झाले होते.
अचानक ढगाळ वातावरण झाले अन् मुसळधार पाऊस सुरू झाला.कोयना बॅकवॉटरच्या अगदी पंधरा फूटपर्यंत हेलिकॉप्टर खाली आले होते. त्यामुळे काहीवेळ मुख्यमंत्री शिंदेंसह सर्वचजण टेन्शनमध्ये आले होते.
याचवेळी आजूबाजूच्या कोणत्याही एका शेतामध्ये हेलिकॉप्टर लँड करावे का? याबाबत पायलट आमच्याजवळ विचारणा करत होते.परंतु, त्या सोयीची कोणतीही जमीन आजूबाजूला नसल्याने आमचे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा माघारी दरे या गावाच्या दिशेने निघाले. जेथून आम्ही टेकऑफ घेतला होता, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना अधिक प्रमाणात असताना महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वजण सुखरुप आहोत. या संपूर्ण प्रसंगादरम्यान वाचताना केलेल्या पुण्यकर्माची आठवण झाली. आता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो आहोत अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांच्या टीमकडून देण्यात आली आहे.