
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी – रवि राठोड
पालघर : एलडेल एजूकेशन ट्रस्ट संचालित,सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साह, जल्लोष आणि सृजनशीलतेच्या वातावरणात प्रतिष्ठित M4 आंतरशालेय स्पर्धा 2025 पार पडली. वसई ते दहाणू परिसरातील 17 शाळांतील 353 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
इंजिनिअरिंग हॉलमध्ये पार पडलेल्या उद्घाटन समारंभात पारंपरिक दीपप्रज्वलन करून विद्यार्थ्यांना प्रज्ञा आणि सृजनशीलतेचा संदेश दिला. उपस्थित पाहुण्यांचे व परीक्षकांचे स्वागत रोपटी, स्मृतिचिन्हे व मानचिन्हे देऊन करण्यात आले. कॅम्पस अकॅडमिक डायरेक्टर डॉ. (श्रीमती) सविता टावरो यांनी विद्यार्थ्यांना सृजनशीलता व बुद्धिमत्तेचे महत्त्व सांगितले.
दिवसभर विद्यार्थ्यांनी चार विभागात आपली प्रतिभा सादर केली. म्युझिक (गायन) विभागात सुरेल आवाज व प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. मेलडी (नृत्य) विभागात ताल, लय व सर्जनशीलतेने भरलेली रंगतदार नृत्यप्रस्तुतींनी रंगमंच खुलून गेला. मास्टरमाईंड (प्रश्नमंजुषा) विभागात ज्ञान आणि तत्पर विचारांची थरारक लढत प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवली. मास्टर ओरेटर (वक्तृत्व) विभागात तरुण वक्त्यांनी आत्मविश्वास, स्पष्टता आणि ठामपणे आपले विचार मांडले.
दिवसभराच्या स्पर्धेनंतर निकाल जाहीर करण्यात आला. म्युझिक (गायन) मध्ये क्रेडो वर्ल्ड स्कूल, दहाणू विजेता ठरले. मेलडी (नृत्य) मध्ये आयॉक न्यूटन ग्लोबल स्कूल (कॅटेगरी I) व सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल, पालघर (कॅटेगरी II) प्रथम क्रमांक मिळवले. मास्टरमाईंड (प्रश्नमंजुषा) मध्ये विजेता सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल, पालघर ठरले. मास्टर ओरेटर (वक्तृत्व) मध्ये सब-ज्युनिअर व ज्युनिअर विभागात क्रेडो वर्ल्ड स्कूल, दहाणू तर सीनियर विभागात यू.एस. ओस्तवाल इंग्लिश अकॅडमी, बोईसर विजेते ठरले.
मुख्य पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले आणि विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देताना सभागृह आनंदाने दुमदुमले.
M4 आंतरशालेय स्पर्धा 2025 विद्यार्थ्यांसाठी सृजनशीलता, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, मैत्रीभाव आणि आरोग्यदायी स्पर्धा भावना दृढ करणारा अनुभव ठरली. या स्पर्धेने विद्यार्थ्यांना गाण्याची, नृत्याची, चिंतनाची आणि वक्तृत्वाची संधी प्रदान करून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली.