
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी – रवि राठोड
पालघर : सोनापंत दांडेकर विधी महाविद्यालय पालघर व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेशीर साक्षरता शिबिर व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात रॅगिंग विरोधी कायदे तसेच अंमली पदार्थांचे सेवन, त्याचे दुष्परिणाम आणि कायदेशीर शिक्षांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख वक्ते म्हणून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सौ. ए. व्ही. चौधरी उपस्थित राहिल्या. त्यांनी रॅगिंग हा केवळ शिस्तभंग नसून दंडनीय गुन्हा असून त्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी आहेत यावर भाष्य केले. तसेच अमली पदार्थांचे सेवन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याबरोबरच भविष्यासाठी कसे घातक ठरते आणि त्यावर कायद्यांतर्गत कोणत्या शिक्षांचा समावेश आहे हे स्पष्ट केले.
अॅड. तेजल ठाकूर यांनी रॅगिंग संदर्भातील कलमे व शिक्षा विद्यार्थ्यांसमोर मांडत, समाजहितासाठी विधी विद्यार्थ्यांनी जबाबदार भूमिका पार पाडण्याचे आवाहन केले. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार थोरात यांनी अंमली पदार्थ व सायकोट्रॉपिक पदार्थ नियंत्रण अधिनियम १९८५ मधील तरतुदी आणि राज्य शासनाने जारी केलेल्या ताज्या परिपत्रकाची माहिती दिली. पोलिस यंत्रणेला या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मिळालेल्या अधिकारांची माहितीही त्यांनी दिली.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोरेला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर प्रेरणा शर्मा (शुक्ला) यांनी प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. प्राध्यापक वर्ग, विधी सेवा समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर साक्षरतेबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली असून, समाजातील प्रत्येक पीडित व गरजू व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.