दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी – रवि राठोड
पालघर : (मोखाडा) शिवसेनेतील माजी नेते प्रकाश निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मोठा राजकीय धक्का दिला असून, “या निवडणुकीत पहिल्यांदाच मोखाडा पंचायत समितीवर कमळ उमलणार,” असा ठाम दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
निकम यांनी सांगितले की अजून अनेक स्थानिक कार्यकर्ते लवकरच भाजपमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेसमोर गंभीर संकट उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
भाजपमध्ये गटबाजी होईल का, या प्रश्नावर निकम म्हणाले – “भाजप हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे. इथे गट-तट नाहीत आणि माझ्या येण्यानेही निर्माण होणार नाहीत.”
दरम्यान, शिवसेनेतील आपल्या नाराजीचा पाढा त्यांनी पत्रकार परिषदेत वाचला. “कुपोषण, बालमृत्यू यांसारख्या प्रश्नांवर काम करूनही मला सतत दुय्यम वागणूक मिळाली. माझी भाषणे कापली जात होती, जिल्हा प्रमुखांकडून संपर्क होत नव्हता, आमदारकीची संधी नाकारली गेली. त्यामुळे मी नाराज झालो,” असे त्यांनी सांगितले.
जिजाऊ पक्षातून निवडणूक लढवण्याचा अनुभवही त्यांनी मांडला. “त्या पक्षाने शेवटच्या क्षणी विश्वासघात केला. ज्यांनी धोका दिला त्यांनाच पदे देण्यात आली. अशा नेतृत्वाखाली काम करणे माझ्यासाठी शक्य नव्हते,” असे निकम म्हणाले.
मोखाडा पंचायत समितीवर आजवर शिवसेना आणि राष्ट्रवादी (शप) यांनी आलटून पालटून सत्ता गाजवली आहे. मात्र समितीच्या सभापतीपदी भाजपचा प्रतिनिधी कधीच बसला नाही. निकम यांच्या भाजप प्रवेशामुळे आता हे चित्र पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.