
पुणे: ज्येष्ठांच्या आशीर्वादाने तरुणांच्या साथीने गोरगरीब, कष्टकरी शेतकर्यांना न्याय देण्यासाठी अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरत असून परिवर्तन घडवण्यासाठी साथ देण्याचे आव्हान करत, रुईच्या बाबीर बुवाचा गुलाल उचलून शपथ घेऊन मला साथ द्या,असे म्हणत मीही या गुलालाची शपथ घेऊन सांगतो उमेदवारी माघार घेणार नाही, असा विश्वास व्यक्त करत पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी इंदापूर विधानसभेसाठी अपक्ष निवडणुकीचा उमेदवारी अर्ज बुधवारी (दि. 23) दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शक्ती प्रदर्शन करत जाहीर सभा झाली. सभेमध्ये हजारोंच्या संख्येने मतदार सहभागी झाले होते.
या सभेला संबोधित करताना प्रवीण माने म्हणाले, या इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे. 1995 साली तिरंगी लढत झाली. अपक्षाचा विजय झाला याच इतिहासाची पुनरावृत्ती 2024 मध्ये होणार आहे.
अपक्ष निवडून येणार आहे. तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नावर आवाज उठून ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी घेतली आहे. त्यासाठी मला पाठिंबा द्या तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. अफवांना बळी पडू नका. ही निवडणूक जनतेच्या दरबारात आहे.
यावेळी सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, प्रवीण माने यांनी तालुक्यात विकास निधी बरोबरच अनेक गोरगरीब जनतेची सेवा केली आहे.
आरोग्याची मदत असो की सामुदायिक विवाह सोहळा, विविध शिबिरे घेऊन त्यांनी अनेकांचा दुवा घेतला आहे. यावेळी सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने, दादा थोरात, बापूराव साबळे,
आझाद मुलाणी, रामदास बनसोडे, कुंडलिक धुमाळ, विलास घोळवे, रवी भावे, विजया कोकाटे, नवनाथ माने, पप्पू खारतोडे, शरद चितारे, तानाजी धोत्रे, बाळासाहेब चितळकर यांची भाषणे झाली. बापू जामदार यांनी आभार मानले…