
पुणे:विधानसभा निवडणुकांच्या घोषणेला दहा दिवस होण्यासोबतच अर्ज भरण्याची मुदत सुरू होऊन चार दिवस उलटले, तरी पुण्यातील काही जागांवर अद्यापही महायुती, तसेच महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.
त्यामुळे पुण्याच्या राजकीय पटलांवर उमेदवारीच्या गणितांची समीकरणे मांडली जात असून, त्यात सर्वच राजकीय पक्षांत मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मागे ठेवले असून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पर्वती, खडकवासला मतदारसंघांतील उमेदवार मागे ठेवण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने कोथरूड मतदारसंघात सस्पेन्स ठेवला आहे.
त्याच वेळी महायुतीत भाजपने केवळ कोथरूड, शिवाजीनगर, पर्वतीचे उमेदवार जाहीर केले असून, कसबा, खडकवासला आणि कॅन्टोन्मेंटबाबत धीराचे धोरण अवलंबले आहे. नाराजांना रोखण्यासाठी ही खेळी असल्याचे बोलले जात असले, तरी त्यामागे इतर राजकीय समीकरणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या समीकरणांची खुमासदार चर्चा
– वडगाव शेरीतून राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला असला, तरी जगदीश मुळीक अद्यापही भाजपकडून लढण्याच्या आशेवर असून, या मतदारसंंघात मैत्रीपूर्ण लढतीबाबत बोलले जात आहे.
– शिवाजीनगर भाजपचे सनी निम्हण काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांची मुंबई आणि दिल्लीवारी सुरू आहे. त्यामुळे शिवाजीनगर काँग्रेसचे दत्ता बहिरट यांची उमेदवारी कापली गेली, तर ते मनसेकडून लढू शकतील. याच चर्चेमुळे शिवाजीनगर मनसेचे रणजित शिरोळे यांचा मनसेला जय महाराष्ट्र केल्याचे बोलले जात आहे.
– खडकवासल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर दत्ता धनकवडे, तसेच विकास दांगट भाजपकडून लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र, पक्षाकडून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्यासह दीपक नागपुरेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
– कोथरूड येथील भाजपचे नाराज नगरसेवक अमोल बालवडकर मशाल हाती घेण्याच्या तयारीत असून, दोन दिवसांपासून बालवडकर मुंबईत तळ ठोकून असल्याची चर्चा आहे.
– कसबा मतदारसंघात ऐन वेळी ब्राह्मण उमेदवाराची मागणी पुढे आल्याने मागील पोटनिवडणुकीचा धडा लक्षात घेता भाजपकडून नेमके कोणते समीकरण मांडले जाणार, याची चर्चा आहे.
– पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेसनेचीही या जागेची मागणी केली असून, काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागूल यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.