
- भोकर विधानसभेत पहिल्यांदाच मनसे कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली
दै. चालू वार्ता
भोकर प्रतिनिधी
विजयकुमार चिंतावार
भोकर / ( नांदेड ) :- ८५ – भोकर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदाच उमेदवार दिला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार साईप्रसाद जटालवार यांनी जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काल मंगळवार (दि.२९) ऑक्टोबर रोजी, भव्य शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भोकर तालुका हा हिंदुत्ववादाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचारास व हिंदुत्ववादास मानणारे निर्णायक मतदार भोकर विधानसभा मतदारसंघात आहेत. मनसेचे दबंग जिल्हाप्रमुख मॉन्टीसिंग जहागीरदार यांच्या शिफारशीवरून व मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सहावी उमेदवाराची यादी जाहीर करत त्यात १९ उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली त्यात भोकर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष साईप्रसाद जटालवार यांनाही उमेदवारी मिळाली आहे. मनसेने ८५ – भोकर विधानसभेत यापूर्वी उमेदवारी दिली नव्हती ही उमेदवारी पहिल्यांदाच देण्यात आलेली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. काल येथील नांदेड रोडवरील मनसे कार्यालयात राज ठाकरे यांना वंदन करून शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली द्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार, जिल्हा शहर अध्यक्ष अब्दुल शफीक, मनविसे जिल्हाध्यक्ष अनिकेत परदेशी, दीपक स्वामी, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड, सुशील बिच्चेवार, मारुती जंगमवाड यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मनसेच्या अद्वितीय रॅलीने प्रस्थापीत विरोधकांच्या उरात धडकी भरली आहे.
मनसेचे तालुकाध्यक्ष साईप्रसाद जटालवार हे मागील अनेक वर्षापासून समाजसेवेत असून रात्रंदिवस गोरगरिबांच्या सेवेत उपलब्ध होत असतात. ते राजकारणी कमी समाजसेवक जास्त असल्यामुळे लोकात त्यांचा दांडगा प्रभाव आहे. मागील चार वर्षापासून ते मनसेमध्ये असून मनसेचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांचा प्रस्थापितांशी दोन हात करण्याचा स्वभाव गोरगरीब लोकांना भावतो. अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग भोकर विधानसभा मतदारसंघात आहे. म्हणून काल उमेदवारी दाखल करताना कार्यकर्ते व मतदाराने प्रचंड मोठी गर्दी केली होती.