
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमधील ४ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डरबनमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात संजू सॅमसनची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली.
या फटकेबाजीच्या बळावर भारतीय संघाने २० षटक अखेर २०२ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला १४१ धावा करता आल्या. आहेत. दरम्यान भारतीय संघाने हा सामना ६१ धावांनी जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २०३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करम आणि रिकलटन ही जोडी मैदानावर आली होती. मात्र अवघ्या ८ धावांवर दक्षिण आफ्रिकेला पहिला मोठा धक्का बसला.
मार्करम ८ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर रिकलटन २१, स्टब्स ११ धावांवर माघारी परतला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.
भारतीय संघाने केल्या २०२ धावा
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना संजू सॅमसनने तुफान फटकेबाजी करत ५० चेंडूत १०७ धावांची शानदार खेळी केली.
तर तिलक वर्माने ३३ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने २१, रिंकू सिंगने ११,हार्दिक पंड्याने २, अभिषेक शर्माने ७ आणि अक्षर पटेलनेही ७ धावांची खेळी केली. संजू सॅमसनच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद २०२ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी. २०३ धावांचं आव्हान ठेवलं.
संजू सॅमसनचं विक्रमी शतक
बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात शतक झळकावणारा संजू सॅमसन या सामन्यातही चमकला. सलामीला फलंदाजी करताना त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धू धू धुलाई करत त्याने २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
त्यानंतर ४७ चेंडूत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. यासह तो टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सलग २ शतक झळकावणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला..